आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टर्समधून टोळीयुद्ध भडकवण्याचा इशारा, यंत्रणा खडबडून जागी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या बदलीनंतर शहरातील गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असताना गेल्या आठवड्यात चक्क जिल्हा न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीबाहेरच काही अज्ञात व्यक्तींनी पोस्टर्स लावून एकप्रकारे शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकवण्याचा इशाराच दिला. पोलिसांनी तातडीने ही पोस्टर्स फाडून टाकल्याचेही समजते. या पोस्टर्सचा संबंध गेल्या काही दिवसांपासून एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या चांगले पगारे टोळीशी असल्याचे बोलले जात आहे.

मोहन चांगले त्याचा साथीदार सोनवणे याच्या खून प्रकरणी चांगले कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून माजी महापौर अॅड. यतिन वाघ यांचे बंधू दादा वाघ, गिरीश शेट्टी, अर्जुन पगारे, व्यंकटेश मोरे, राकेश कोष्टी यांच्यासह काही
जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर संशयित अर्जुनचा भाऊ भीम पगारे याचाही काही महिन्यांतच खून झाला. या घटनांचा संबंध चांगले पगारे टोळीतील वर्चस्ववादाशी असल्याचे बाेलले जाते.

या गुन्ह्यातील संशयितांविरोधात पोलिसांनी मोक्काअन्वये कारवाई केलेली असतानाच दुसरीकडे चांगले खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन्ही गटातील समर्थकांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. तरीही एका गटाकडून उघडपणे पोलिस यंत्रणेला आव्हान देत टोळीयुद्ध भडकवण्याचा इशारा पोस्टर्सद्वारे दिल्याची बाब चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या आठवड्यात रात्री एका गटाने जिल्हाधिकारी कार्यालय न्यायालय आवारात ही पोस्टर्स लावली होती. मात्र, पोलिसांनी रातोरात ती पोस्टर्स हटविल्याचे सांगण्यात येते. नवनियुक्त पाेलिस आयुक्त जगन्नाथन यांनीही ही बाब गंभीरपणे घेत वरिष्ठ अधिकार्‍यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस यंत्रणेलाच थेट आव्हान दिल्याच्या या प्रकाराने यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

सराईत गुन्हेगारांची धरपकड
पोलिसांनी सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर अंबड पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दोन्ही टोळ्यांशी संबंधित सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवत त्यांची धरपकडही सुरू केल्याचे समजते.