आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांची परवानगी न घेताच नाशकात विक्रेत्यांनी थाटले गाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा रुग्णालय परिसरात गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यास पोलिस आयुक्तालयाची परवानगी मिळाली नसताना, रुग्णालय परिसरात अनेक मूर्ती विक्रीची गाळे थाटण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक दिवसांचा हा वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे निर्माण होणार आहे.

गणेशमूर्ती विक्रीसाठी काही वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाबाहेर गाळे उभारले जात आहेत. हा संपूर्ण भाग न्यायालय आदेशान्वये सायलेन्स झोनमध्ये मोडत असल्याने अनेक मंडळे वाद्य वाजवून शांतता भंग करतात. त्यामुळे रुग्णांना याचा प्रचंड त्रास होत असल्याचे या काळात निदर्शनास आले आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी होत असल्याने या कोंडीचा त्रास शहरभर होत असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. रुग्णालयाबाहेर पोलिस प्रशासनाकडून गाळे थाटण्यास परवानगी नाकारण्यात येते. मात्र, पालिका प्रशासन येथेच गाळे उभारण्याकरिता आग्रही असल्याचेही निदर्शनास आले आहे. यंदा पोलिसांनी स्पष्टपणे परवानगी नाकारत यावर चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरले असतानाही मूर्ती विक्रेत्यांनी परस्पर गाळे थाटले आहेत. यामागे पालिकेची भूमिका संशयास्पद आहे.

परवानगी नाकारणार
जिल्हा रुग्णालय परिसर सायलेन्स झोन असल्याने येथे गाळे उभारण्यास परवानगी देणे योग्य नाही. पोलिस प्रशासनाकडे प्रस्ताव आल्यास गाळ्यांना परवानगी नाकारण्यात येईल.
-कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त, नाशिक शहर

भाऊ- दादांची भाईगिरी
परवानगी नसताना गाळे थाटणार्‍यांमागे भाऊ- दादांचा वरदहस्त असल्याने परवानगी नसतानाही रुग्णालयाबाहेर गाळे उभारले जात आहेत. या गाळेधारकांवर मनपा आणि पोलिसांकडून कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

या मुद्यांमुळे आक्षेप
गणेश चतुर्थी आणि पूर्वसंध्येला मूर्तीच्या स्टॉलजवळ वाद्याचा आवाज आणि जयजयकार यामुळे रुग्णांना त्रास होतो. न्यायालयाच्या आदेशान्वये रुग्णालय परिसर हा सायलेन्स झोन घोषित आहे.