आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नि:स्वार्थी नेतृत्व अस्तंगत, गणपतराव काठे यांना श्रध्दांजली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राजकारणातील स्वार्थी प्रवृत्ती वाढत आहे. पक्षासाठी झोकून देणा-या तसेच निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्यांची संख्या दिवसें-दिवस घटत असल्याची खंत व्यक्त करत भविष्यात गणपतराव काठेंसारख्या नि:स्वार्थी माणसांची राजकारणात उणीव भासेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी काठे यांना श्रध्दांजली अर्पण केली.
प. सा. नाट्यगृहात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या काठेंनी शिस्त आयुष्यभर जपली. राजकारणात कधीही दुस-याला मोठे होऊ दिले जात नाही. मात्र, काठे यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिल्याचे सांगत नाशिकच्या विकासात काठेंचे मोठे योगदान असल्याचे खडसे म्हणाले.
> राजाभाऊ मोगल
(राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)
संघाच्या माध्यमातून त्यांच्या नेत्वृत्वगुणाला आकार मिळाला. नेतृत्वगुण असूनही ते आयुष्यभर कार्यकर्ते म्हणून सामान्यांमध्ये वावरले.
> मधुकर झेंडे (अध्यक्ष, सावाना) संघाकडून गणपतरावांनी शिस्त घेतली. राजकीय प्रवासासोबतच माणूस म्हणून त्यांनी मित्रांना कायम साथ दिली.
> अजय बोरस्ते
(महानगरप्रमुख, शिवसेना)
त्यांच्या जाण्याने मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे.
> डॉ. दौलतराव आहेर
जरासे हट्टी पण प्रामाणिक कार्यकर्ते. माणूस जोडणारा कार्यकर्ता म्हणजे गणपतराव काठे.
> डॉ. कैलास कमोद
(अध्यक्ष, ओबीसी महामंडळ)
ते निष्ठावान कार्यकर्त्यांपैकी एक होते. त्यांच्याजवळ अहंभाव नव्हता.
> मनीष बस्ते
(जिल्हा सरचिटणीस, शेकाप) लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेला आणि आक्रमक शैलीचा नेता आपल्यातून गेला. त्यांच्या स्वभावात निर्मळपणा होता.
> अरविंद देशपांडे
(भारतीय मजदूर संघ)
निर्मळ मनाचा कार्यकर्ता कसा असतो याचे उदाहरण म्हणजे काठे.
> दामोदर मानकर
(व्ही. एन. नाईक संस्था)
जाती-धर्माच्या भिंतीपलीकडे जाऊन त्यांनी आयुष्यभर माणसे जोडली.
यावेळी माजी खासदार माधवराव पाटील, विठ्ठल तिडके, बिरदीचंद नहार, बाबूराव वनमाळी, जनकल्याणचे ज्ञानेश्वर काकड, पोपट जगझाप आदींनीही काठे यांना श्रध्दांजली अर्पण केली.
माणसे जपली
जातीधर्माच्या पलीकडे जाण्याची किमया गणपतरावांना साधता आली. स्पष्टवक्तेपणाशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी आपल्या स्वभावाने नेहमीच माणसे जोडली आणि जपली हे त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ठ्य म्हणावे लागेल, असे मत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गणपतराव काठे यांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले.