आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्यातून कमाईचा अजब फंडा, भंगार वेगळे करून मागणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाढताेय राेष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहराचा तसेच लोकसंख्येचा ज्या वेगाने विस्तार होत आहे, त्याच वेगाने घनकचऱ्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. कचरा साचत गेला तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यात घंटागाडी हा महत्त्वाचा घटक ठरला असला तरी या घंटागाडीचे कर्मचारी, त्यांचे ठेकेदार यांचे उद्योग पाहता आरोग्याची ऐशीतैशी होण्यास फारसा वेळ लागणार नाही. गेल्या काही दिवसांपासून घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून कचरा वेळेवर उचलणे, ठराविक ठिकाणचाच कचरा उचलणे, अरेरावी करणे, पैसे मागणे तसेच नागरिकांकडून कचरा वेगळा आणि भंगार वेगळे करून मागणे असे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात आरोग्याधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे िदसून येते. शहरातील विहितगाव, सिडको, सातपूर, जुने नाशिक, पंचवटी नाशिकरोड विभागात घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून सर्रास कचऱ्याएेवजी भंगारची मागणी नागरिकांकडून केली जात असल्याच्या काही तक्रारी आहेत. तर, काही ठिकाणी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून चक्क दर महिन्याला नागरिकांकडून कचरा उचलण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचेही समोर आले आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्याच कारभारावर अाता प्रश्नचिन्ह उपस्थित हाेऊ लागले अाहे.
दरमहिन्याला घेतले जातात पैसे...
अशोकामार्ग परिसरातील काही सोसायट्यांमधून कचरा उचलण्यासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून सर्रास पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. या भागातील सोसायट्यांमधील कचरा उचलण्यासाठी दर महिन्याला ५०० ते हजार रुपयांची मागणी केली जाते. ज्या सोसायटीकडून पैसे दिले जात नाहीत, त्यांच्या सोसायटीमधील कचरा उचलला जात नसल्याचेही समोर आले आहे. यामुळे नागरिकांच्या गैरसाेयींत वाढ हाेत अाहे.

नियमांकडेही हाेतेय दुर्लक्ष...
महापालिकेचे एकूण सहा विभाग आहेत. या सहाही विभागांसाठी ठेकेदारांना कचरा उचलण्याच्या कामाचे कंत्राट दिलेले आहे. कंत्राट करताना करारात महापालिकेने अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत. या अटींनुसार प्रत्येक घंटागाडीवर एक चालक तीन कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच, वेळेबरोबरच कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट लावणे बंधनकारक केलेले आहे. कचऱ्याची उचल करून तो विल्होळी येथील पालिकेच्या खत प्रकल्पात टाकण्याची सक्ती केलेली आहे. हा कचरा उचलताना प्रभागातील एकही गल्ली अथवा सोसायटीत कचरा राहता कामा नये, अशीही अट घालण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र वेगळाच अनुभव येतो.

थेट प्रश्न
प्रशासनाकडे नियाेजनाचा अभाव; कर्मचाऱ्यांना याेग्य सूचना देणे गरजेचे
^महापालिका प्रशासनाने घंटागाड्यांच्या फेऱ्यांबाबत याेग्य नियाेजन करायला हवे. जेणेकरून नागरिकांची गैरसाेय हाेणार नाही. तसेच, अाेला अाणि सुका कचरा वेगळा मागण्याबाबत कर्मचाऱ्यांना व्यवस्थित सूचना द्यायला हव्यात. जेणेकरून नागरिकांकडून भंगार वेगळे करून मागितले जाणार नाही अाणि गैरप्रकारांनाही अाळा बसेल. अनेकदा कर्मचारी पुठ्ठे, प्लास्टिक, बाटल्या अादी वस्तू वेगळ्या करून मागतात. पण, कचऱ्यातून त्या निवडणे कसे शक्य अाहे? - त्रस्त महिला

अनियमित घंटागाड्यांचा त्रास कायम; तक्रारींकडे दुर्लक्षच
^सिडकाे परिसरात घंटागाड्यांची अनियमितता हे चित्र नवीन नाही. अनेकदा दाेन-दाेन दिवस घंटागाडी येत नाही, कधी दिवसाअाड येते. वेळही निश्चित नसते. अशा स्थितीत माेठ्या प्रमाणावर कचरा साचताे. पालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन घंटागाडी नियमित यावी, याकरिता संबंधितांना सूचना कराव्यात. जेणेकरून महिलांना कचरा टाकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. - त्रस्त महिला

..तर संघटनेकडून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई हाेणार
^शहरातील कोणत्याही भागात जर कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलणे, अरेरावी करणे, पैसे मागणे कचरा वेगळा आणि भंगार वेगळा करून मागणे, अशा तक्रारी येत असतील तर संबंधित कर्मचाऱ्यांवर संघटनेमार्फत कारवाई केली जाईल. यामागेही संघटनेतर्फे काही कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम शहर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका संघटनेची आहे. - महादेव खुडे, अध्यक्ष,नाशिक महानगरपालिका श्रमिक संघ

भंगाराकडेच लक्ष; कचरा उचलण्यात हाेताे विलंब
कचरा उचलण्याऐवजी घंटागाडी कर्मचारी कचऱ्यातील प्लास्टिकच्या वस्तू, लोखंड, पितळ अॅल्युमिनिअमच्या वस्तू वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरण्यातच वेळ घालवतात. पिशव्यांमध्ये गोळा झालेल्या भंगाराचा अंदाज घेऊन या घंटागाड्या भंगार विक्रेत्यांच्या दुकानाकडे जातात. या ठिकाणी बराच वेळ वाया जातो. त्यामुळे इतर भागातील कचरा तसाच पडून राहत असल्याचे दिसत आहे. अनेकदा वॉर्डांमध्ये घंटागाडी वेळेवर येत नसल्याचे हे एक महत्त्वाचे कारण असावे. याकडे संबंधित ठेकेदारांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे बनले अाहे.

कचरा देतेवेळी भंगार वेगळे देण्याची मागणी
सिडकोसह वडाळा, विहितगाव परिसरातील काही ठिकाणी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना कचरा देतेवेळी भंगार वेगळे देण्याची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी अाहेत. विशेष म्हणजे, या भंगाराची लागलीच भंगार दुकानांत विक्री करून पैसे कमावले जात असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे.

कर्मचाऱ्यांचे अनेकदा हाेतात महिलांसाेबत वाद...
घंटागाडीवरील कर्मचारी हे ठेकेदाराच्या सेवेत असल्यामुळे नागरिकांना जुमानत नाही. तक्रार केल्यास वाद घालतात. एखाद्या सोसायटीजवळ अवघी दोन ते तीन मिनिटेच थांबतात. या वेळेत जो कचरा येईल तेवढाच घेऊन ते निघून जातात. त्याबद्दल त्यांना हटकल्यास कचरा घेतल्यानंतर कचऱ्याची बकेट मोठमोठ्याने ठोकून आवाज करतात. तर, या कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितल्यास ते महिलांशी वाद घालत असल्याच्यादेखील तक्रारी आहेत.

कचऱ्यातून होतेय लाखो रुपयांची उलाढाल
घंटागाडीत कचरा उचलताना भंगारयुक्त कचराही टाकला जातो. परंतु, कापड, कागद या प्रकारचा कचरा उचलण्याचे टाळले जाते. त्यामुळे मूळ कचरा तेथेच राहतो लोखंडयुक्त कचरा उचलला जातो. सध्या लोखंडयुक्त कचऱ्यातून कचरा बाहेर काढून लोखंडाचे तुकडे किस बाजारात विकला जातो. सध्या बाजारात लोखंडाची किंमत पंधरा ते वीस रुपये किलो इतकी आहे. एका फेरीत साधारण दहा किलो लोखंडाचा किस तुकडे प्राप्त होत असल्याने पैशाच्या लालचेने अशाच प्रकारचा लोखंडयुक्त कचरा उचलण्यास प्राधान्य दिले जात असल्याने मूळ कचरा मात्र साचतच असल्याचे दिसून येते. परिणामी, नागरिकांच्या तक्रारी वाढत अाहेत.

असाही कमाईचा धंदा
महापालिकेच्या वतीने अंबड औद्योगिक वसाहतीतील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी ठेवली असली तरी त्यावरील कर्मचाऱ्यांनी कारखान्यांचा कचरा उचलण्याऐवजी भंगार एकत्रित करून त्यातून कमाई करत असल्याच्या तक्रारी आहेत.अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीमधून मोठ्या प्रमाणात भंगारयुक्त कचरा बाहेर पडतो. कचऱ्यात मोठ्या प्रमाणात लोखंडाचे तुकडे येत असल्याने घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यातूनही कमाईचे मार्ग सापडत अाहेत.
शहर स्वच्छतेची अाणि पर्यायाने नागरिकांच्या अाराेग्याची जबाबदारी असलेल्या ‘घंटागाडी’ कर्मचाऱ्यांकडून हाेणाऱ्या मनमानी कारभाराबाबत गेल्या काही दिवसांपासून तक्रारी वाढत असून, पालिका प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाकच करीत असल्याचे दिसून येते. घंटागाड्यांची अनियमितता ही समस्या तर नाशिककरांना नवीन नाहीच, परंतु अाता ठराविक ठिकाणीच कचरा उचलणे, अरेरावी करणे, पैसे मागणे तसेच कचरा अन‌् भंगार वेगळे करून मागणे अशा काही तक्रारी नागरिकांकडून ‘डी. बी. स्टार’कडे अाल्या आहेत. या प्रकरणी ‘डी. बी. स्टार’ने पाहणी केली असता, काही घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून कचऱ्यातील भंगार वेगळे करून कचरा डेपाेत गाडी जाण्यापूर्वी थेट भंगार विक्रेत्यांना ते विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस अाला. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराचे कान धरण्याऐवजी त्याला पालिका पाठीशी घालण्याचा प्रकार हाेत असल्याने या प्रकारांत वाढ हाेत अाहे.
{ घंटागाडी कर्मचाऱ्यांविरोधात काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत का?
-घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अद्याप काही तक्रारी आलेल्या नाहीत. याची विभागीय कार्यालयात माहिती घेतो.
{घंटागाडीत कचरा देताना भंगार आणि कचरा वेगवेगळे करून देण्याची मागणी कर्मचारी करतात, असे का?
-आेला कचरा वेगळा आणि आणि सुका कचरा वेगळा द्यावा, असे आवाहन घंटागाडी कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांना केले जाते. भंगार वेगळा करण्यास सांगणे चुकीचे अाहे. अशा कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई केली जाईल.
{शहरातील अनेक भागात घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. याची माहिती आहे का?
-नागरिकांकडून कचरा उचलण्याचे पैसे मागितले जात असेल तर त्याबाबत खाेलवर चौकशी करून संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावणार अाहे.