आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांचा ‘आवाज’ अन् निरीक्षकाचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आपल्याच प्रभागात वाढलेल्या कचर्‍याने त्रस्त झालेल्या महापौरांनी घंटागाडी निरीक्षकाच्याच श्रीमुखात भडकविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. फूलबाजार येथे गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संबंधित निरीक्षकाने दिला. दरम्यान, संबंधित कर्मचार्‍याला आपण खडे बोल सुनावल्याचे सांगतानाच, श्रीमुखात भडकविल्याचा आरोप मात्र महापौरांनी नाकारला आहे.

फूलबाजारातील कचराकुंडीचा प्रश्न वादात आहे. या भागात नियमित घंटागाडी येत नसल्याने परिसरातील नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. याशिवाय, फूलविक्रेतेदेखील विक्री न झालेली फुले व कचरा या भागात टाकतात. त्यामुळे परिसरात मोठी कचराकुंडी तयार होते. याविषयी परिसरातील व्यावसायिकांनी महापौरांकडे वारंवार तक्रार केली होती.

संबंधित प्रभागातून महापौर अँड. यतिन वाघ हेच निवडून येत असल्याने त्यांचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याची चर्चादेखील परिसरात केली जात होती. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे यांना हा कचरा तातडीने उचलण्याचे बुधवारी आदेश दिले. परंतु, गुरुवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत कचरा उचलला न गेल्याने महापौरांनी या कचराकुंडीजवळच आरोग्याधिकारी, विभागीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व घंटागाड्यांचे निरीक्षक यांना बोलवत त्यांची झाडाझडती घेतली.

कचरा जेथे टाकला जातो तो भाग पश्चिम विभागात आहे की पूर्व विभागात, यासंदर्भात संबंधित ठेकेदारांच्या निरीक्षकांमध्ये महापौरांसमोरच वाद सुरू झाला. या वेळी महापौरांशी शंतनू बोरसे हा निरीक्षक वरच्या स्वरात बोलल्याने महापौरांनी रागाच्या भरात त्याच्या श्रीमुखात भडकविल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. संबंधित निरीक्षकानेही यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आपबिती कथन करून आपल्याला महापौरांनी मारहाण केल्याची तक्रार केली. शंतनूचा सहकारी शिवा जोशी यानेही त्यास दुजोरा दिला. महापौरांनी मात्र त्यास नकार दिला आहे.

आरोप निराधार
फूलबाजार परिसरातील कचर्‍याचे ढीग तातडीने उचलण्याचे आदेश मी आरोग्याधिकार्‍यांना देऊनही सकाळी 9.30 वाजेपर्यंत कचरा उचलला गेला नाही. त्यामुळे मी संबंधितांना कचराकुंडीजवळ बोलावून झाडाझडती घेतली. मी गेल्यावर मात्र संबंधिताने माझ्यावर मारझोड करण्याचे निराधार आरोप केले आहेत. - अँड. यतिन वाघ, महापौर

गच्ची पकडून गालात मारली
परिसरातील कचरा उचलण्याची जबाबदारी पूर्व विभागाची असतानाही आम्हाला तो उचलण्यास सांगितले जाते, या बाबीचे मी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, माझे म्हणणे ऐकून न घेता महापौरांनी माझी गच्च्ी पकडत गालात मारली. मात्र, महापौर आपलेच असल्यामुळे मी पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करणार नाही. शंतनू बोरसे, घंटागाडी निरीक्षक, पश्चिम विभाग

आंदोलन करणार
जेव्हा जाब विचारला जातो तेव्हा आम्हाला त्याचा खुलासा करावा लागतो. परंतु, महापौरांनी हे समजून न घेता आमच्या सहकार्‍याला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ आम्ही कामबंद आंदोलन करणार आहोत. शिवा जोशी, घंटागाडी निरीक्षक

महापौरांचे कृत्य योग्यच
महापौर स्वत: कुंडीजवळ आले. मात्र, त्यांच्यासमोरच हद्दीचा वाद कर्मचार्‍यांनी सुरू केल्याने रागाच्या भरात महापौरांनी संबंधित कर्मचार्‍याच्या श्रीमुखात भडकवली. महापौरांनी केलेले हे कृत्य योग्यच आहे. - राजेंद्र शहाणे, सराफ व्यावसायिक तथा प्रत्यक्षदश्री

संपूर्ण भागात दुर्गंधी
संपूर्ण शहर कचराकुंडीमुक्त झाले असले तरीही आमचा प्रभाग मात्र अद्याप तसाच आहे. या कुंडीमुळे ट्रॅफिक जामच्याही समस्येला सामोरे जावे लागते. मुकुंद आडगावकर, सराफ व्यावसायिक

तरीही नगररत्न पुरस्कार
या भागात कचर्‍याची समस्या जुनीच आहे. असे असताना महापालिकेला स्वच्छतेचा नगररत्न पुरस्कार मिळतोच कसा, याचाही शोध घेणे गरजेचे आहे. हेमंत जगताप, सामाजिक कार्यकर्ता