आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदावरीच्या घाटावर घंटागाड्यांची स्वच्छता, पात्रात टाकला जाताे कचरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-  सिंहस्थात कोट्यवधी रुपये खर्च करून भाविकांच्या सोयीसाठी स्नान घाट साकारण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत या घाटांचा उपयोग कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या स्वच्छ करण्यासाठी केला जात असल्याची गंभीर बाब ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत उघड झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे घंटागाडीत उरलेला कचराही गाेदावरीतच टाकण्यात येताे. नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने आदेश दिले असताना स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच या आदेशाला केराची टाेपली दाखवली जात आहे.
 
शहर स्वच्छ रहावे, नियमित कचरा उचलला जावा यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारांच्या माध्यामातून घंटागाड्या नेमण्यात आलेल्या आहेत. मात्र, शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या घंटागाड्या थेट नदीपात्रात धुतल्या जात असल्याने नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे.
 
कन्नमवार पुलालगतच्या गोदाघाट परिसरात नदीपात्रात घंटागाड्या धुतल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे नदीपात्रात फक्त घंटागाड्या धुण्यापुरता मर्यादित राहता त्यापुढेही जात घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून कचराही नदीपात्रात फेकला जात आहे. एकीकडे गोदावरीचे वाढते प्रदूषण रोखण्याबाबत राष्ट्रीय हरित लवाद अाणि उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याबाबत अादेश दिले असताना दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे. सामान्य नागरिकांनी नदीचे प्रदूषण केल्यास दंडात्मक कारवाई करणारी महापालिका प्रशासन या घंटागाड्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
दंडात्मक कारवाई करणार
गाेदावरीच्या पात्रात कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्यांची स्वच्छता करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा अाहे. असा प्रकार काेणी करत असेल तर त्या ठेकेदार, कर्मचाऱ्यंाच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यता येईल.
- सुनील बुकाने, आरोग्यधिकारी, महापालिका
 
कुंपणच शेत खाई....
स्मार्ट सिटीत समावेश झालेेले नाशिक शहर स्वच्छ रहावे, नियमित शहरातील कचरा संकलित केला जावा यासाठी महापालिकेने खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून घंटागाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या घंटागाड्यांमुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत असल्याने कुंपणच शेत खात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
 
..तर पालिकेचे उत्पन्न दंड भरण्यातच जाईल
गंगा नदीत कचरा टाकणाऱ्यांवर ५० हजार रुपये अाकारण्याचा निर्णय नुकताच दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादाने दिला अाहे. हा निर्णय गाेदावरी नदीच्या बाबतीत लागू केल्यास महापालिकेचे उत्पन्न दंड भरण्यातच निघून जाईल, असे बाेलले जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...