आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोटाचे हादरे आता यंत्रणेस; गॅस वितरक व अधिका-यांमध्ये खडाजंगी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - देवळाली गावात झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटाचे हादरे नागरिकांना बसल्यानंतर आता या गंभीर प्रकरणाचे चटके संबंधित प्रशासकीय यंत्रणेला बसू लागले आहेत. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नाशिकरोड परिसरातील गॅस वितरकांना अग्निशमन दलातर्फे सुरक्षिततेबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पाचारण करण्यात आले असता गॅस वितरक व अग्निशमन अधिका-यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
स्फोटाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गॅस वितरकांना कागदपत्रांसह अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयात बोलावून घेण्यात आले होते. अग्निशमन दलप्रमुख अनिल महाजन यांनी बैठकीच्या प्रारंभीच गॅस सिलिंडर गुदामांमध्ये अद्यापही अग्निशमन यंत्रणेची पुरेशी व्यवस्था न करण्यात आल्याबद्दल कारवाई करण्याचा इशारा दिला. या इशा-यामुळे राग अनावर झाल्याने वितरकांनी ‘आमच्या व्यवसायासाठी केंद्र सरकारचे नियम असून, तुमचे नियम आम्हाला मान्य नाहीत,’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या महाजनांनीही आक्रमक पवित्रा घेत या स्फोटास तुम्हीही जबाबदार असल्याचे खडे बोल सुनावले. त्यानंतर प्रकरण अंगाशी येण्याचा धोका ओळखून वितरकांनी गप्प बसणेच पसंत केले. अखेर गुदामासाठीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची हमी देऊन त्यांनी काढता पाय घेतला.
नियमांचे पालन आवश्यक - गॅस वितरकांनी गुदाम सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाने बंधनकारक केलेल्या नियमांची अंमलबजावणी अद्याप केलेली नसल्याने त्यांना बोलावण्यात आले होते. त्यांचा व्यवसाय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्या नियमानुसार गुदामे असल्याचा त्यांचा दावा होता; नियमांमध्ये झालेले बदल त्यांच्यासाठी बंधनकारक आहेत व त्याची त्वरित अंमलबजावणी आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले. नियमांचा भंग झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. - अनिल महाजन, अग्निशमन अधिकारी
अंमलबजावणी करू - घटना घडल्यानंतर जाग आल्याचा हा प्रकार आहे. नियमाप्रमाणे आमची गुदामे असताना आता नवीन नियमाप्रमाणे पाण्याची टाकी उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचीही अंमलबजावणी करू. - भारत गॅस एजन्सी, नाशिकरोड
आयडेंटीफाईड चिप्सद्वारे सिलिंडरची तपासणी - देवळाली गावातील सिलिंडर स्फोटांची तपासणी ‘आयडेंटीफाईड चिप्स’द्वारे करण्यात येणार असून, तशा सूचना संबंधित कंपन्यांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी दिली. मात्र, या चिप्स केवळ हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सिलिंडरमध्येच असून, इतर कंपन्यांच्या सिलिंडर तपासणीत अडचण येणार आहे. कंपनी अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत तपासात हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. गुदामामधील 98 सिलिंडरपैकी 20 सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्यांची तपासणी शक्य नाही. त्यामुळे उर्वरित 78 सिलिंडरची तपासणी केली जाईल. चिप्सद्वारे ट्रॅक केल्यानंतर या सिलिंडरची एजन्सी व अपेक्षित ग्राहकांचे नाव समजेल. सिलिंडरसंदर्भातील सर्वच माहिती चिप्समुळे उघड होणार आहे. दोषींवर जीवनावश्यक प्रतिबंध आणि स्फोटक प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. गुन्ह्याची प्रत प्राप्त होताच शासनास अहवाल सादर केला जाणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.