आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिकी शिक्षणातून सशक्त राष्ट्राच्या दिशेने वाटचाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोणत्याही राष्ट्राला सशक्त बनवायचे असेल, तर त्या देशातील सैनिकी ताकद खूप महत्त्वाची ठरते. आपल्या देशाला परकीय शत्रूंपासून वाचविण्याचे काम सीमेवरील सैनिकांनी केले आहे. हे सैनिकी बळ निर्माण करण्याचे काम भोसला सैनिकी स्कूलसारख्या शाळांनी केले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केले. अशा शाळांद्वारेच लहान वयात मुलांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविले जात आहेत, असेही सावरा म्हणाले.

मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्था संचलित भोसला सैनिकी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशाला सशक्त करण्यासाठी सैनिकी शिक्षणाची गरज असून, त्या दिशेने सैनिकी शाळांमधून चांगली वाटचालदेखील सुरू आहे. संमेलनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांच्या कौशल्याची प्रचिती येते.

या वेळी नाशिक विभागाचे अध्यक्ष दिवाकर कुलकर्णी, दिलीप बेलगावकर, आशुतोष रहाळकर, नरेंद्र वाणी, शीतल देशपांडे, नितीन गर्गे, कमांडंट चंद्रसेन कुलथे, प्राचार्य सतीश महाले, विशाल जोशी आदी उपस्थित होते. या स्नेहसंमेलनांतर्गत शनिवारी (दि. २) पारितोषिक वितरण केले जाणार आहे.
भाेसला मिलिटरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेली थरारक प्रात्यक्षिकांनी काही क्षण उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. ज्वालांचा अडथळा पार करत शत्रूवरील आक्रमण, योगासने, मुष्ठीयुद्ध आणि मनोरे असे विविध प्रकार डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.

प्रात्यक्षिकांतून शक्तीचे दर्शन
विद्यार्थ्यांनी अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यात योगा, बॉक्सिंग, लेझीम, जिम्नॅस्टिक, कवायत, मलखांब इत्यादी प्रात्यक्षिके सादर केली.

प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पनेला वाव
भोसला सैनिकी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील चित्रप्रदर्शनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यात विज्ञान, चित्रकला, हस्तकला, भूगोल, क्रीडा, संरक्षण, गणित आणि संगणक अशा विविध विषयांवरील चित्रांचे समावेश असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते झाले. मुलांनी काढलेल्या चित्रांमधून मुलांचे भावविश्वच उलगडत असल्याचे विचार सोनार यांनी या वेळी व्यक्त केले. हे प्रदर्शन मुलांसाठी प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.