आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्र्याचे छोटेसे घर, जिद्दीने गाठले दहावीत यशोशिखर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घरात अठरा विश्व दारिद्र्य, पत्र्याच्या शेडमध्ये राहून पोटाची खळगी भरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मोलमजुरी करणारे आई-वडील.. अशा हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने मात करत गौरव शिरसाठ याने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण संपादन करत शाळेत पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, जिद्द आणि हुशारी पाहून गौरवची शिवसेनेच्या वतीने शिवदत्तक योजनेंतर्गत वर्षभरापूर्वी निवडही करण्यात आली होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गौरवने दहावीत मिळविलेल्या यशाने शिवदत्तक योजनेत झालेली निवडही सार्थ ठरली आहे.
रोजगाराच्या शोधार्थ साधारण आठ वर्षांपूर्वी विष्णू शिरसाठ आपल्या कुटुंबीयांसह पाथर्डीत आले. एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये राहून त्यांनी मिळेल ते काम करत घर चालविले. गावातीलच आदिवासी सेवा समिती संचलित माध्यमिक शाळेत गौरवने दहावीची परीक्षा दिली. शिक्षणासाठीचा खर्च परवडणार नाही म्हणून आई-वडिलांनी त्याला शाळा सोडून देण्यास सांगितले. परंतु, गौरवची हुशारी पाहून त्याचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनीच त्याचे नाव शिवदत्तक योजनेसाठी सुचविले. शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख सुदाम डेमसे यांनी या योजनेंतर्गत गौरवसह एका विद्यार्थिनीला दत्तक घेत त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला. गौरवनेही जिद्दीने अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळविला. त्याला शिवसेनेचे कार्यकर्ते संजय डेमसे, दत्तात्रय डेमसे, ज्ञानेश्वर भुसारे यांचे सहकार्य मिळाले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याचे गाैरवचे स्वप्न असल्याने त्याला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.

योजना सार्थ ठरली
^शिवसेनेच्या वतीने दरवर्षी शिवदत्तक योजनेंतर्गत गरजू मुलांना दत्तक घेतले जाते. त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला जातो. आर्थिक कारणांमुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, यासाठी गरजू विद्यार्थ्यांची निवड केली जाते. वर्षभरासाठी लागणारा सर्व शैक्षणिक खर्च उचलून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. गौरवने शाळेत पहिला क्रमांक मिळविल्याने शिवदत्तक योजनेचा उद्देश सार्थ ठरला आहे. - सुदाम डेमसे, शिवसेना उपमहानगरप्रमुख

इंजिनिअरिंगमध्ये करिअरचे स्वप्न
^दहावीच्या शिक्षणासाठी मला आर्थिक मदत मिळू शकल्यानेच चांगले गुण मिळवता आले. शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन, योजनेचा हातभार आणि आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे यश मिळाले. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न आहे. - गौरव शिरसाठ, विद्यार्थी

मदतीसाठी संपर्क
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्तुंग यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे केवळ आर्थिक कारणांमुळे शिक्षणात खंड पडू नये, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज आहे. बिकट परिस्थितीत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यशाेगाथा ‘दिव्य मराठी’ प्रसिद्ध करीत अाहे. गौरव शिरसाठ या विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्य वा अार्थिक मदत मिळाल्यास त्याचा शिक्षणाचा प्रवास अव्याहतपणे सुरू राहील. त्याला अार्थिक मदत करण्यासाठी ८८८८६८४४४४, ९०२१६१५६४० तसेच एसबीआय बँक अकाउंट नंबर ३१६३५९८५४४१ येथे आर्थिक मदत करता येईल.
बातम्या आणखी आहेत...