आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये सुरू होणार जेनेटिक्स कोर्सेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जेनेटिक्स हे वैद्यकीय क्षेत्र आतापर्यंत केवळ लिंगनिदान चाचणीपुरतेच मर्यादित समजले जात होते, परंतु जेनेटिक्सच्या उपयोगीतेची गरज लक्षात घेऊन या विषयातील आरोग्य विद्यापीठ मान्यताप्राप्त कोर्सेस येत्या ऑगस्टमध्ये नाशिकमध्ये सुरू होत आहेत.
थॅलसॅमिया, सिकलसेल, कर्करोग, नात्यामध्येच लग्न केल्याने पुढील पिढीस येणारे शारीरिक व मानसिक अपंगत्व अशा अनेक दुर्धर विकारांवरील उपचारांबाबत नवे संशोधन जेनेटिक्सच्या अभ्यासातून होऊ शकेल. या विषयाच्या अभ्यासासाठी आवश्यक कोर्सेस देशात आत्तापर्यंत केवळ लखनऊ येथील संजय गांधी मेडिकल महाविद्यालयातच होते. त्यामुळे या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या देशात अत्यल्प आहे.
येथील एबीबी सर्कलजवळील कोहम जेनेटिक्स अँड पब्लिक हेल्थ अवेअरनेस रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. ज्ञानदेव चोपडे लवकरच आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने हे जेनेटिक्स कोर्सेस सुरू करणार आहेत. त्यास यश आल्यास राज्यात अशा प्रकारचे कोर्सेस प्रथमच सुरू होतील.
आतापर्यंत केवळ पुणे, मुंबई व नाशिकमध्ये जेनेटिक्स हा एम.एस्सीचा अभ्यासक्रम होता. परंतु, डॉ. चोपडे यांच्या रिसर्च सेंटरद्वारे मेडिकल फेलोशिप इन क्लिनिकल जेनेटिक्स आणि काही सर्टिफिकेट कोर्सेस करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. देशात जेनेटिक्समध्ये तज्ज्ञ असलेले साधारणपणे दहा ते बाराच डॉक्टर्स आहेत
गॅप उपक्रम - लोकांमध्ये तसेच सरकारदरबारी जेनेटिक्सबाबतच्या संशोधनाचा गंभीरपणे विचार होऊन त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जावी तसेच या विषयाकडे विद्यार्थ्यांनी वळावे यासाठी डॉ. चोपडे प्रयत्नशील आहेत. आपल्या सेंटरमार्फत ते गॅप म्हणजे जेनेटिक अवेअरनेस प्रोग्राम हा उपक्रम राबवीत आहेत.
अशी आहे पात्रता - सर्टिफिकेट कोर्स सहा महिन्यांचा आहे. फेलोशिप एक वर्षाची असून त्यासाठी एमबीबीएस आवश्यक आहे. तसेच रिप्रोडक्टिव्ह जेनेटिक्ससारखे कोर्सेस आयुर्वेद, होमिओपॅथीमधील पदवीधारकांनादेखील करता येऊ शकतील.
काय आहे जेनेटिक्स - लिंगनिदान चाचणीसाठी भारतात व इतर देशांमध्ये सुरुवातीला जेनेटिक्सचा आधार घेतला गेला. त्यामुळे जेनेटिक्सचा विचार फक्त लिंगनिदान चाचणीपुरताच आजही केला जातो. पण डाऊन सिंड्रोम, थॅलसॅमिया, थायरॉइड, सिकलसेल, कर्करोग असे आजार तसेच नात्यात लग्न केल्याने पुढच्या पिढीला होणारे शारीरिक व मानसिक विकार आदींसाठी जेनेटिक्समध्ये तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांची गरज भासते. आपल्या पाल्याला भविष्यात काय आजार होऊ शकतात वा त्याच्या जन्मापूर्वीच त्याला होणार्‍या संभाव्य विकारांचे, लग्नापूर्वीच जोडीदारांना लग्नानंतर उद्भवणार्‍या विविध समस्यांचे निदान जेनेटिक्सच्या आधारे होऊ शकते. मात्र, लोकांमध्ये जागृती नसल्याने तसेच अशा डॉक्टरांची संख्या अत्यल्प असल्याने अशा समस्यांचे प्रमाण अधिक वाढत जाते.