आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घंटागाडी ठेक्याला सिंहस्थाचा झाेका, पाच वर्षांसाठी ठेका देण्याच्या हालचाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्याच्या व्यस्त कार्यक्रमांचे कारण देत महापालिकेच्या अाराेग्य विभागाने विद्यमान घंटागाडी ठेकेदारांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा पवित्रा घेतल्याचे वृत्त असून, तसा प्रस्ताव अायुक्तांनाही दिला जाणार अाहे. विशेष म्हणजे, महापाैरांकडून महासभेचा ठराव प्राप्त झाला नसल्याचे कारण देत पदाधिका-यांवर खापर फाेडण्याचा या विभागाचा प्रयत्न अाहे. दुसरीकडे, महासभेने तीन वर्षांपर्यंतचा ठेका देण्याचा निर्णय घेतला असताना, मुदत वाढवून ताे पाच वर्षांपर्यंत वाढवण्याच्याही हालचाली अाहेत.
पालिका क्षेत्रातील घंटागाडी व्यवस्था अनेक वर्षांपासून वादाचा विषय ठरली अाहे. मध्यंतरी ठेकेदार कर्मचा-यांच्या वादात घंटागाडीचे कामकाज ठप्प हाेऊन शहरात कच-याचे ढीग साचले हाेते. दरम्यान, शहरातील घंटागाडी व्यवस्थेला शिस्त लागावी यासाठी अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी स्वत: प्रस्ताव तयार केला. तत्पूर्वी चांगल्या पद्धतीने कचरा संकलन करणा-या सुरत, अहमदाबादसारख्या शहरातील व्यवस्थांचा अभ्यास करण्यात अाला. हा प्रस्ताव महासभेवर अाल्यानंतर नगरसेवकांनी विराेध केला. दहा वर्षांकरिता ठेका दिल्यानंतर ठेकेदाराने अर्धवट काम साेडले तर काय करणार, तीनशे काेटींच्या ठेक्याला अाधार काय, असे मुद्दे उपस्थित करीत तीन वर्षांकरिता घंटागाडीचा ठेका देण्याचा निर्णय महासभेने घेतला. त्यात एका ठेकेदाराकडे जास्तीत जास्त तीन विभागांचे कामकाज असेल, अशी अटही घातली. या ठरावाच्या अनुषंगाने तातडीने फेरप्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी सादर करणे निविदा काढण्याची प्रक्रिया हाेणे क्रमप्राप्त हाेते. प्रत्यक्षात अाराेग्य विभागाने महासभेचा ठराव अप्राप्त असल्याचे कारण देत विद्यमान घंटागाडीच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याचा घाट घातला अाहे.

मुदतवाढीसाठी ठेवणार प्रस्ताव
घंटागाडी ठेक्याची मुदत जुलैमध्ये संपत असून, विद्यमान ठेकेदारांना मुदतवाढ देण्याचा विचार सुरू अाहे. त्यासाठी अायुक्तांसमवेत चर्चा हाेणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय हाेईल. डाॅ.सुनील बुकाने, अाराेग्याधिकारी, महापालिका

५० काेटींपर्यंत जाणार ठेका
तीनशेकाेटींचा ठेका रद्द झाल्यानंतर अाता तीन वर्षांकरिता ५० काेटींपर्यंत घंटागाडीचा ठेका असेल, असे अाराेग्य विभागातील सूत्रांचे म्हणणे अाहे. अर्थात, महासभेचा ठराव प्राप्त नसल्याने ठेक्याची मुदत किती, याविषयी हा विभाग संभ्रमात अाहे.

मुदतवाढीचा निर्णय अपरिहार्य
जुलैराेजी घंटागाडी ठेक्याची मुदत संपत असून, सद्यस्थितीत नव्याने निविदा काढणे पालिकेच्या अावाक्याबाहेरची बाब अाहे. दहा वर्षांचा घंटागाडी ठेक्याचा प्रस्ताव हाणून पाडल्याने दुखावलेल्या अायुक्तांनीही तूर्त या प्रश्नाकडे काणाडाेळा केल्याचे समजते. नेमकी हीच बाब हेरून अाराेग्य विभागाने या ठेक्याला मुदतवाढ देण्याची तयारी सुरू केली.