आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ नाेव्हेंबरपासून शहरात नवीन घंटागाड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाच वर्षांसाठी २७६ काेटी रुपये खर्चून नव्याने दिलेल्या घंटागाडी ठेक्याचे कामकाज १२ नाेव्हेंबरला सुरू करण्याचा स्थायी समिती सभापती सलीम शेख यांचा प्रयत्न असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही सेवा लाेकार्पित केली जाणार अाहे.

महापालिका क्षेत्रातील घंटागाडीचा विषय अत्यंत वादग्रस्त हाेता. जुन्या ठेकेदाराकडे महापालिकेची १२२ हून अधिक वाहने हाेती. यातील अनेक घंटागाड्यांचे दहा वर्षांचे अायुर्मान संपल्यामुळे दुरवस्था झाली हाेती. 'काेणाला चाक नाही', 'चाक असेल तर टायरचे वांदे,' अशी दयनीय अवस्था हाेती. अनेक घंटागाड्या बंद पडून वाहतूक काेंडी हाेत हाेती.
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मनसेच्या काळात नवीन घंटागाडीचा ठेका देण्याचे ठरले. मात्र, तत्कालीन अायुक्तांचा दहा वर्षांसाठी ठेका देण्याचा अाग्रह महासभेचा मात्र तीन वर्षांचा ठेका देण्याचा कल यात बराच काळ घंटागाडीचे घाेंगडे भिजत पडले. त्यानंतर पाच वर्षांसाठी ठेका निश्चित झाला; मात्र टनाप्रमाणे कचऱ्याला पैसे देणे अपेक्षित असताना प्रतिदिन ४०० टन कचऱ्याचा हिशेब केला तर सरासरी प्रतिटन १६४२ रुपये याप्रमाणे वार्षिक २३ ते २५ काेटींपुढे ठेका जाणार नाही, असे गृहीतक मांडले गेले. त्यातून घंटागाडी याेजनेत ५० काेटींची उधळपट्टी हाेत असल्यासारखे अाराेप झाले.

दरम्यान, त्यातून सभापती शेख यांनी मार्ग काढत ठेका मंजूर करताना कमी अधिक रकमेचा विषय अायुक्तांच्या काेर्टात साेडून मनसेवर डाग लागणार नाही, असा प्रयत्न केला.
दरम्यान, अाता नवीन घंटागाड्या १२ नाेव्हेंबरला शहरात सुरू करण्याचा प्रयत्न अाहे. या कामाचे उद‌्घाटन नाशिक दाैऱ्यावर असलेल्या ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न अाहे. अर्थात, त्यासाठी राज ठाकरे यांना साकडे घातले जाणार असून त्यांच्या परवानगीनंतरच उद‌्घाटन साेहळा हाेणार अाहे.

घंटागाडी कर्मचाऱ्यांना ८८ हजारांची दिवाळी भेट
महापालिकेच्याजुन्या कंत्राटदाराकडे असलेल्या ५०७ घंटागाडी कर्मचाऱ्यांना ८८ हजारांची दिवाळी भेट मिळणार अाहे. मागील ठेक्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०१५ नुसार सुधारित किमान वेतन लागू झाले. प्रत्यक्षात, त्याचा फरक मात्र दिला जात नव्हता. त्यावरून चांगलाच वादही झाला. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई महापालिकेने केली हाेती. अखेरीस अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी त्यात मार्ग काढून ठेकेदाराकडील अनामत रकमेतून साडेचार काेटींची वजावट केली अाहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना फरकाची घसघशीत रक्कम मिळणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...