आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल योजनेत ‘घोळ’, लाभार्थ्यांकडून गोंधळ, दलालांद्वारे आलेल्या लाभार्थ्यांना घरे मिळाल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - काहीवर्षांपासून रखडलेल्या नासर्डी नदीपात्रालगतच्या शिवाजीवाडी येथील रहिवाशांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी (दि. ११) ३०० घरांचे वाटप झाले. मात्र, घर सर्वेक्षणातील यादीत दिलेल्या लाभार्थींऐवजी दुस-यांनाच मिळाल्याने पालिकेच्या पूर्व विभागात संतप्त नागरिकांनी मोठा गोंधळ केला. पैसे भरूनही घर मिळाल्याने या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

राज ठाकरे यांच्या हस्ते शिवाजीवाडी येथील रहिवाशांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरांचे वाटप शनिवारी करण्यात आले. यात ओंकार एजन्सीच्या सर्वेक्षणानुसार वाटप केले जाणार होते. मात्र, हा सर्व्हे नंतर पालिकेने केलेल्या सर्व्हेत तफावत असल्याने खरे लाभार्थी वंचित असल्याचे दिसून आले. ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेल्या या घरांत शेकडो लाभार्थींना घरेच मिळाली नसल्यामुळे त्यांनी मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयात धाव घेतली. कार्यालयातील झोपडपट्टी विभाग अधिकारी, कर्मचारी बराच वेळ कार्यालयात आल्याने झोपडपट्टी विभागाबाहेर सकाळी वाजेपासून बसलेल्या संतप्त नागरिकांनी घाेषणाबाजी केली.

यानंतर साडेदहा वाजेच्या सुमारास विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांनी नागरिकांनी संवाद साधून संपूर्ण माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे आश्वासन देऊन निघून गेल्या. यानंतर नागरिकांनी वारंवार झोपडपट्टी विभागाच्या अधिका-यांना संपर्क केला असताना त्यांचे फोन बंद असल्याचे समोर आले. तब्बल चार तासांनंतर अधिकारी झोपडपट्टी विभागात आले उपस्थित नागरिकांना शुक्रवारी प्रकरणाची तपासणी करून घर ताब्यात देणार असल्याचे आश्वासन झोपडपट्टी विभागाचे सहायक अधीक्षक जी. जी. भोईर यांच्या वतीने देण्यात आले. दलालांच्या मध्यस्थीने अपात्र असलेल्यांना पात्र ठरविण्याचा प्रयत्न यात करण्यात आला असून, यासाठी बनावट कागदपत्र सादर करण्यात आल्याचे आरोपदेखील यावेळी नागरिकांनी केला.

१५ वर्षांची आता अट का?
अधिका-यांकडून टाळाटाळ
लोकांनादाखविण्यासाठी काही घरकुल योजनेतील घरांचे वाटप करण्यात आले. मात्र, आम्ही खरे लाभार्थी असताना आम्हाला अजून या योजनेतील घर मिळालेले नाही. पालिकेच्या अधिका-यांकडून घरे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. -रफिया सय्यद, लाभार्थी

पुरावे पाहून देणार घरे
शनिवारी दिनांक ११ जुलै रोजी महापालिकेच्या या घरकुल योजनेअंतर्गत एकूण १४० लाभार्थींना घरांचे वाटप करण्यात आले. वाटपाव्यतिरिक्त इतर बाकी असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना येत्या शुक्रवारी त्यांच्याकडील पुरेसे पुरावे पाहून घरकुलांचे वाटप करणार आहे. १५ वर्षे जुन्या रहिवाशांनाच घरे वाटप होणार आहे. बाकींच्या पैशांबाबत उपायुक्त बहिरम हे निर्णय घेतील. जी.जी. भोईर, सहायक अधीक्षक, झोपडपट्टी विभाग

या घरकुल योजनेची चौकशी करण्याची गरज..
मूळ शिवाजीवाडीत राहणा-या बहुतांश नागरिकांचे यादीत नाव आलेले नाही. मात्र, या नागरिकांकडून महापालिकेने घरकुल योजनेचे १७ हजार ५४० रुपये घेतले आहे, तर अनेक नागरिकांकडून काही दलालांमार्फत अतिरिक्त पैसे घेऊन घर देण्यात आले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होण्याची गरज आहे. हिराबाईपवार, लाभार्थी

याघरकुल योजनेतील लाभार्थ्यांना राज ठाकरे यांच्या हस्ते घरांचे वाटप करण्यात आले. ३०० घरांच्या वाटपाच्या घोषणेची मात्र प्रत्यक्षात १४० लाभार्थींना घरे देण्यात आले. तसेच, बाकी लाभार्थींना सोमवारी वाटण्यात येतील, असे सांगण्यात आले. मात्र, सोमवारी लाभार्थी महापालिकेत गेले असताना १५ वर्षे जुना रहिवासी पुरावा सादर करावा लागणार असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले. तसेच, संपूर्ण पैसे घेऊन तसेच सर्व पुरावे घेऊन आता अचानक १५ वर्षांच्या पुराव्याची अट का घालण्यात आली, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
ख-या लाभार्थ्यांत एकीकडे संताप, तर दुसरीकडे हतबल महिला लाभार्थ्यांना रडू आवरले नाही.

सर्वेक्षणात देखील घोळ
शिवाजीवाडी झोपडपट्टी जुनी असल्याने येथील रहिवाशांची घरकुल योजनेसाठी निवड होणे याेग्य असले तरी ओंकार एजन्सीने फक्त नदीकाठच्या लोकांचाच सर्व्हे केल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे मूळ शिवाजीवाडीत राहणा-या बहुतांश नागरिकांची यादीत नावे नाहीत. मात्र, या नागरिकांकडून महापालिकेने घरकुल योजनेचे १७ हजार ५४० रुपये घेतले आहे. या ठिकाणी आठ इमारती उभारण्यात आल्या असून, त्यात ६२० फ्लॅट तयार करण्यात आले आहेत. आता या नागरिकांना घर मिळणार का, अशीही शंका निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...