नाशिक- ‘लेक वाचवा, देश वाचवा, महिलांचा आदर राखा, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, मुलींना उच्च शिक्षण द्या,’ अशी प्रतिज्ञा घेत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सोमवारी सुरक्षित व संतुलित भविष्याचा संकल्प केला. निमित्त होते, मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आर्ट ऑफ लिव्हिंग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कन्येचा सन्मान हीच आमची शान’ या प्रतिज्ञा अभियानाचे.
या अभियानास दैनिक ‘दिव्य मराठी’चे सहकार्य लाभले असून, त्या अनुषंगाने सोमवारी पेठरोड येथील उन्नती प्राथमिक विद्यालय, शासकीय कन्या विद्यालय, शासकीय अध्यापिका विद्यालय आणि वडाळागाव परिसरातील जे.एम.सी.टी. तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभियानात सहभागी होत प्रतिज्ञा घेतली.
स्त्री-पुरुष समानता हवी
मुलगा हा वंशाचा दिवा आहे, या एका गैरसमजातून समाजात मुलाच्या जन्माचे स्वागत होते, तर मुलीचा जन्म नाकारला जातो. त्यामुळे मुलगा हाच वंशाचा दिवा हा विचार काढून टाकण्याची गरज आहे.
- सरोज जगताप, प्राचार्या, शासकीय अध्यापिका विद्यालय
उपक्रम स्तुत्य
स्त्रीभ्रूण हत्या तसेच लेक वाचवा हा जनजागृतीपर उपक्रम स्तुत्य असून, त्यामुळे समाजात जनजागृती व परिवर्तन होण्यास मदत होईल. समाजातील सर्व स्तरांमध्ये ही मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज आहे.
-नंदलाल धांडे, मुख्याध्यापक
दुजाभाव नकोच
मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण दिले जाते, तर मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. मुला-मुलींमध्ये दुजाभावाची भावना कुटुंबातून सुरू होते ती शिक्षणाच्या मुद्यापासूनच. त्यामुळे मुलींची प्रगती होत नाही. त्यासाठी मुला-मुली मध्ये दुजाभाव टाळून उच्च् दर्जाचे शिक्षण पालकांनी मुलींना देण्याची गरज आहे.
-फय्याज अली, प्राचार्य, जेएमसीटी कॉलेज
विचार बदलण्याची गरज
समाजात वावरताना महिला सर्वाधिक असुरक्षित आहेत. त्यामुळे महिलांना स्वरक्षणाचे धडे मिळायला हवेत. पोलिसांनीही महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याची गरज आहे. समाजाने आपली मानसिकता बदल्यास मुलींनाही मुलांप्रमाणेच वागणूक मिळू शकेल.
- संगीता सोनार, शिक्षिका