आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन; शिक्षकाला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - इंदिरानगर येथील नाशिक केंब्रिज स्कूलमधील सहावी ते नववीतील विद्यार्थिनींशी शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याचा आक्षेप घेत संतप्त पालकांनी शुक्रवारी (दि. 27) शाळेच्या आवारातच आंदोलन केले. त्यानंतर संबंधित शिक्षकाविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली. संतप्त पालकांसोबत मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्‍यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

वडाळा-पाथर्डीरोडवरील नाशिक केंब्रिज स्कूलमधीलसहावी ते नववीतील विद्यार्थिनींच्या पालकांनी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक सी. सोमू यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार, संशयित शिक्षक सॅग्मो लामा गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करीत होता. संबंधित शिक्षकाकडून होणार्‍या अंगलटीमुळे विद्यार्थिनी घाबरून गेल्या होत्या. हा प्रकार वाढतच गेल्याने पालकांनी बुधवारी (दि. 25) शाळा व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या. एवढेच नव्हे, तर काही पालकांनी शिक्षकाला चोपही दिला होती.

मात्र, तरीही शाळेकडून कुठलीही कारवाई गेली जात नसल्याचे लक्षात येताच पालकांंनी शुक्रवारी सकाळीच शाळेच्या आवारात ठिय्या मांडला. ही घटना मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य गिते, नगरसेविका सुजाता डेरे, अर्चना जाधव, आकाश खोडे, संजय जाधव, अमोल पवार, हेमंत गोवर्धने यांना समजताच त्यांनीही कार्यकर्त्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पालकांसह लोकप्रतिनिधींनी मुख्याध्यापकांना जाब विचारत दालनातच घेराव घातला. हा प्रकार इंदिरानगर पोलिसांना समजताच उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह अधिकारी शाळेत दाखल झाले. पालकांच्या तक्रारी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पोलिसांनी संशयित शिक्षक सॅग्मो लामा (वय 48, रा. गोविंदनगर, मूळ दार्जिलिंग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.
संस्थेविरोधात मनसे आक्रमक
पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार अर्ज करूनही शिक्षकाविरुद्ध कारवाई न झाल्याचे समजताच मनसेच्या पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शाळेने वेळीच संबंधित शिक्षकावर कारवाई केली असती तर आंदोलनाची वेळ आली नसती. संस्थेने शिक्षकास पाठीशी घातल्याचा आरोप करीत पालक व पदाधिकार्‍यांनी निषेध नोंदविला.

मुख्याध्यापकांचा नकार
दरम्यान, पालकांनी केलेल्या आरोपांविषयी मुख्याध्यापक सी. सोमू यांच्याशी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार देत शनिवारी (दि. 28) शाळेत येऊन भेटण्यास सांगून फोन ठेवून दिला.

कायदेशीर कारवाई
विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करण्याचा प्रकार गंभीर असून, संश्यित शिक्षकाविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, या प्रकरणी सखोल तपास करण्यात येईल.
व्ही. डी. श्रीमनवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
फोटो - इंदिरानगरमधील नाशिक केंब्रिज स्कूलसमोर शुक्रवारी आंदोलन करताना संतप्त पालक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी.