आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषबाधा झालेल्या मुली उपचारासाठी सिव्हिलमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : विषबाधा झालेल्या विद्यार्थिनीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणताना.
नाशिक - दिंडोरी येथील आदिवासी वसतिगृहात अन्नातून विषबाधा झालेल्या १७ पैकी मुलींची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. संबंधित मुलींच्या पालकांना मंगळवारी दुपारी या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी आदिवासी विभागाचे अधिकारी, भोजन ठेकेदार आणि दिंडोरीच्या स्थानिक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आदिवासी संघटनांचे पदाधिकारीही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलींना धीर देत होते.

आदिवासी विकास विभागाच्या दिंडोरीतील वसतिगृहातील मुलींची संख्या २८० आहे. तेथे शनिवारी दुपारी विशेष भोजन होते. त्यानंतर सायंकाळपासून काही मुलींना मळमळ, उलट्या आणि जुलाब होऊ लागले. सोमवारी इतरही मुलींची प्रकृती खराब झाली. सर्वांना उपचारासाठी दिंडोरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे या आठ जणींची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुलींच्या पालकांनी आणि आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषदेचे विभागीय अध्यक्ष लकी जाधव, बबलू चव्हाण, योगेश शेवरे, विशाल माळेकर, कैलास शार्दूल, मोहन गांगुर्डे, तानाजी झनकर, देवा वाटाणे, प्रवीण कडाळे, अशोक भोये, रवी भोये, मुनाफ तडवी, अशोक बागुल, अॅड. दत्तात्रय पाडवी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडे करणार चौकशीची मागणी
मुलींची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली. वसतिगृहांना अचानक भेटी देऊन अन्नाची तपासणी केली असती तर असे प्रकार झाले नसते. या प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार चौकशीची मागणी करणार आहे. लकीजाधव, विभागीय अध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी परिषद

विषबाधा झालेल्या मुली दबावाखाली
आम्ही शासनाच्या योजनांवर विश्वास ठेवून मुलींना वसतिगृहात पाठविले, मात्र या ठिकाणची परिस्थिती पाहून काय करावे, हेच समजत नाही. दिंडोरीच्या दवाखान्यातील डॉक्टरांनी लक्ष दिले नसते तर मुलींची प्रकृती बिघडली नसती. दबावाखाली असल्यामुळे त्या काहीही सांगण्यास तयार नाहीत. -तानाजी झनकर, पालक

नमुने तपासणीचा अहवाल येताच कारवाई
अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अन्नाचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. - संदीप गोलाईत, प्रकल्पाधिकारी

तक्रार केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून दबाव
संबंधित भोजन ठेकेदारांविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. त्याबाबत कारवाई तर दूरच, परंतु काही कार्यकर्ते माझ्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. -अर्चना तांबोळी, गृहपाल, दिंडोरी वसतिगृह

उपचारार्थ दाखल मुलींची नावे
सुमित्रामोतीराम राऊत, सुरेखा कांतीलाल गायकवाड, हर्षदा धनराज झिरवाळ, शैला हिरामण डगळे, लता अंबादास गांगोडे, सविता भारत खोटरे, प्रियंका संजय झनकर, ललिता जाधव.