आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलथान कारभार: आश्रमशाळेतील मुलींना कैद्याप्रमाणे वागणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मदर तेरेसा यांनी गरीब रुग्णांची सेवा करून जगात एक आदर्श उभा केला. त्या आदर्शानुसार सोसायटी ऑफ असम्पशन या संस्थेने दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी येथे आदिवासी मुलींच्या कल्याणासाठी ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळा सुरू केली. मात्र, दोन वर्षांपासून या आश्रमशाळेला संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापनाची नजर लागली आणि निवासी मुलींना कैद्याप्रमाणे वागणूक मिळू लागली. ही वागणूक एवढी भयाण आहे की, मुलीच नाही तर पालकसुद्धा त्या समस्याबाबत भीतीपोटी बोलत नाहीत. आदिवासी मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाकडून शासनाचा निधीही पुरविला जातो. आश्रमशाळेच्या व्यवस्थापना विरोधात शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तर अक्षरक्षा मेटाकुटीस आले आहेत.
मुलींच्या समस्येबाबत काही पालकांनी शाळेकडे तक्रार केली, तर त्यांना मुलींना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. याबाबत काही पालकांनी ‘दिव्य मराठी’ कडे तक्रार केली. यानुसार ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष आश्रमशाळेला भेट दिली, तेव्हा शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर सुसान यांनी तुमच्याकडे ओळखपत्र आहे का, याची विचारणा केली. त्यावेळी त्यांना ओळखपत्र दाखविले. त्यांना मुलींच्या समस्येबाबत विचारणा केली असता त्यांनी वीस मिनीट केवळ तुम्ही आम्हाला लेखी तक्रार करा मग आम्ही तुम्हाला उत्तरे देऊ एवढाच सूर लावला.

बाहेर आल्यानंतर सोबत असलेल्या ग्रामपंचायतच्या महिला सदस्या यांनी काही मुलींकडे विचारणा केली, परंतु एकही मुलगी भीतीपोटी काहीच बोलू शकली नाही. या गावातील काही पालकांकडे चौकशी केली असता त्या सर्वांनी संबधित आश्रमशाळेच्या विरोधात मत प्रकट केले. तेथील मुलींच्या समस्येमुळे आम्ही आमच्या मुलींना काढून घेतले असून त्या घरी असलेल्या बऱ्या असे सांगितले. या आश्रमशाळेकडे आदिवासी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा निधी वाया जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या शाळेत मुलींना देण्यात येणारे गणवेश परत घेऊन पुन्हा नवीन वर्षात वापरलेले गणवेश दिले जातात. मुलींना पोटभर जेवायला दिले जात नाही. एक गाजर चार मुलींना वाटप करून दिले जाते आणि अधिकाऱ्यांना आणि संस्थाचालकांना दाखविण्यासाठी पूर्ण जेवण आणि संपूर्ण फळे दिले जात असल्याचे छायाचित्र दाखविले जात असल्याचे शाळेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

आम्ही आश्रमशाळेतीलमुलींना चांगले जेवण देतो आणि त्यांच्या शैक्षणिक विकासासाठीच प्रयत्न करतो. तुम्हाला ज्या पालकांनी समस्या सांगितल्या आहेत, त्या आम्हाला लेखी द्या. त्यानंतरच या विषयीवर बोलू शकते. सिस्टर सुसान, व्यवस्थापिका,ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळा.

आश्रमशाळे विषयी आमच्याकडेतक्रारी आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथील मुलींना त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत आम्ही आदिवासी विभाग आणि खासदारांकडेदेखील तक्रार केली आहे. एकनाथ भरसट, सरपंच,तिल्लोळी

आश्रमशाळेच्या व्यवस्थापिकासिस्टर सुसान या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना घाणेरडी वागणूक देत आहे. ती थांबविण्यासाठी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका, मुख्याध्यापिका यांची हकालपट्टी करावी. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. भरत पटेल, अध्यक्ष,स्वाभिमानी संघ.