आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावला-पावलावर असते भय; अन् म्हणे संरक्षणाची केली सोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - दिल्लीतील ‘निर्भया’चा बळी गेला. मुंबईतही दुसर्‍या ‘निर्भया’ला त्याच घटनेचे बळी व्हावे लागले. तरीही शासनाला आणि पोलिसांना जाग आलेली नाही. थातूर-मातूर कारवाई केल्याचा देखावा होतो आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होते असे चित्र शहरातील चौकाचौकातील दिसत आहे. नाशिकरोड, उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठलीही जागा महिला, विद्यार्थिनींसाठी सुरक्षित नसल्याचे छेडछाडीच्या प्रकारांवरून स्पष्ट झाले आहे.

परिसरातील सर्वात मोठय़ा बिटको कॉलेजलगत पोलिस चौकी असतानाही येथे विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत, तर सानेगुरुजी नगरातील महिला विद्यालय, र. ज. चौहाण हायस्कूल व कोठारी कन्या शाळेच्या बाहेर रोडरोमिंओ दबा धरूनच बसलेले असतात. विद्यार्थिनींना दुचाकीवरून कट मारणे, दप्तर ओढण्याचे प्रकार घडतात. एलआयसी रस्त्यावर पोलिसांची गाडी थांबलेली असताना त्या रस्त्याने जाताना महिला जीव मुठीत धरून जातात.

घटना 1 : छातीत धडकी
वेळ : दुपारी 5
स्थळ : जेलरोड सिंधी कॉलनी
कोठारी कन्या शाळेतील आठवीतील विद्यार्थिनींची गोरेवाडीतील रोडरोमिंयोकडून गेल्या काही दिवसापासून छेडछेड केली जात होती. ती शाळेत जाण्यास नकार देत असे. छातीत धडकी, हातापायाच्या थरकापामुळे तिचे आई-वडील घाबरले होते. चौकशीअंती दोन मुले त्रास देत असल्याचे पुढे आले.

घटना 2 : भावालाच मारहाण
वेळ : सकाळी 11
स्थळ : बिटको कॉलेज
बिटको कॉलेजच्या अकरावीतील विद्यार्थिनीला घरी जाता-येता दमबाजी, छेडछाड केली जात असल्याने तिने भावाकडे तक्रार केली. त्याने जाब विचारला असता त्यालाच गुंडाकडून मारहाणीचा प्रयत्न झाला. अखेर आई-वडिलांना सांगितल्यावर त्यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर एका गुंडाला ताब्यात घेण्यात आले.

घटना 3 : नागरिकांची अनास्था
वेळ : दुपारी 4
स्थळ : जयभवानीरोड
जयभवानीरोडवरून एका महिलेची गाडी थांबवून तिला छेडण्याचा प्रकार घडला. गाडीचा पाठलाग करून तिला थांबवण्यात आले. तिने आक्रमक रूप धारण केल्यावर गुंडांनी महिलेची गाडी पाडून नुकसान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. महिलेने विनवणी करूनदेखील कोणीच मदतीला धावून आले नाही.