नाशिक - ‘आजच्या परिस्थितीत कोण कोण माझ्यासोबत आहे, हेही मला कळेल,’ अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माजी आमदार व पक्षाचे सरचिटणीस वसंत गिते यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील सुमारे २०० पदाधिका-यांचे राजीनामे मंगळवारी मंजूर केले. दुसरीकडे, राजीनामा मंजूर झाल्यानंतर गिते यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी तूर्तास मनसेसोबतच कार्यकर्ता म्हणून राहण्याची भूमिका घेतली आहे. येत्या दोन दिवसांत नाराज कोणती वाट निवडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
विधानसभेतील दारुण पराभवानंतर नाशिकसह राज्यभरातील मनसेच्या पदाधिका-यांनी राजीनामे देण्याचा धडाकाच लावला होता. मुंबईतील नेते प्रवीण दरेकर यांच्या पाठोपाठ नाशिकमधील माजी आमदार व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत गिते, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, प्रकाश दायमा यांच्यासह सुमारे २०० हून अधिक पदाधिका-यांनी मनसे अध्यक्षांकडे राजीनामे पाठवले. तत्पूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. मात्र, मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. राज ठाकरे यांची मुलगी रुग्णालयात दाखल असल्याने ते याच कामात व्यग्र होते.
दरम्यान, मंगळवारी दुपारी राज यांनी एक पत्रक काढून राज्यभरातील पदाधिका-यांनी दिलेले राजीनामे मंजूर करत असल्याचे कळवले. याच पत्रात राज यांनी नाजूक परिस्थितीत
आपल्यासोबत कोण आहे हेही यानिमित्ताने कळेल, असे भावनिक आवाहनही केले. पक्षाध्यक्षांनी राजीनामे मंजूर केल्यानंतर गिते यांच्यासह पदाधिका-यांनी अन्य पक्षात जाणार नसल्याचे तूर्तास कळवले आहे.
पद नको, मात्र पक्षातच राहणार
राजसाहेबांनी राजीनामे मंजूर केल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे. वसंत गिते, माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस, मनसे.