आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: गोदापार्क, गंगापूररोड ‘मार्गी’; भूसंपादनास तत्त्वत: मान्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जेहान सर्कल ते गंगापूरपर्यंतच्या 30 मीटर रस्त्यासह गोदापार्क प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनास संबंधित जागामालकांनी तत्त्वत: मान्यता दिल्याने अनेक वर्षांपासून भिजत पडलेला प्रश्न सिंहस्थापूर्वी मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र, नव्याने जागा संपादित करताना आधीच्या मोबदल्याबरोबरच सातबारा उतार्‍यावरून क्षेत्र कमी करण्याची मागणी मिळकतधारकांनी केली आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे रुंदीकरण आणि गोदापार्कसाठी सोमेश्वर घाट (सव्र्हे नं. 16) ते गंगापूरपर्यंतचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. भूसंपादन होत नसल्याने ही कामे रखडली होती. महापौर अँड. यतिन वाघ यांनी मिळकतधारकांना आमंत्रित केले होते. बैठकीतील निर्णयानुसार मिळकतधारकांनी जमीन देण्यास तत्त्वत: मान्यता दिली असून, त्या बदल्यात योग्य ते दर किंवा टीडीआर देण्याबाबतही लगेचच निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

सोमेश्वर घाट ते गंगापूरदरम्यान गोदापार्क पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाणार असून, संत आसारामबापू आर्शम पुलापुढील सुयोजित गार्डनकडील पुढचा भाग ते घारपुरे घाट पुलापर्यंतची जमीनही संपादित केली जाणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

दोन्ही बाजूंनी नऊ मीटर रस्ता : गंगापूररोड मूळ 12 मीटर आहे. आता शहर विकास आराखड्यानुसार जेहान सर्कल ते गंगापूर गावापर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूने प्रत्येक नऊ मीटर होणार आहे. त्यापैकी उजव्या बाजूचा सर्व्हिसरोड यापूर्वीच महापालिकेने पूर्ण केलेला आहे.

कार्यवाहीअभावी रस्ताच बेकायदेशीर
आनंदवल्लीपासून गंगापूरपर्यंतच्या नऊ मीटर रस्त्याचे क्षेत्र ताब्यात असूनही त्याची रीतसर कार्यवाही महापालिकेने पूर्ण केलेली नाही. त्यामुळे हा रस्ताच बेकायदेशीर असून, नव्याने संपादित होणार्‍या जागेसंदर्भात संबंधित मिळकतधारकांना आधी कायदेशीर नोटीस दिल्यानंतरच भूसंपादन कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

आधीचा मोबदला द्या
यापूर्वी उजव्या बाजूच्या नऊ मीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी जागा संपादित केलेली आहे. मात्र, अद्यापही त्याचा मोबदला मिळालेला नाही. तसेच, महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याचे क्षेत्रही अद्याप मिळकतधारकांच्या सातबारा उतार्‍यावरून कमी केलेले नाही. यामुळे क्षेत्र मोजणी करताना शेतकर्‍यांना ती डोकेदुखी ठरत आहे. नव्याने जमीन संपादित करताना आधीच्या जागेचा मोबदला दिला जावा.
- मुरलीधर पाटील, अध्यक्ष, सोमेश्वर मंदिर ट्रस्ट