आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव एफएसआयने गोदापार्क शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वाढीव एफएसआय आणि टीडीआरच्या आधारे रिंगरोड व गोदापार्कसह विविध प्रकल्प साकारण्याचे वारंवार ठराव होऊनही त्यासाठी नाशिक महापालिकेत आजवर कधीही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक प्रयत्न झालेले नाहीत. दुसरीकडे मात्र, शेजारील गुजरातसारख्या राज्याने याच पद्धतीने सार्वजनिक वाहतूक व साबरमतीसारखा भव्यदिव्य प्रकल्प साकारून ‘असाध्य ते साध्य’ करून दाखविले आहे.

शहरातील सांडपाणी व औद्योगिक वसाहतींमधील रसायनेमिर्शित पाणी गोदावरी नदीमध्ये सोडले जात असल्याने दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरीच्या प्रदूषणाचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. गोदाघाट सुशोभीकरणाच्या नावाखाली आजवर 100 कोटींचा निधी खर्च होऊनही प्रदूषण जराही कमी होऊ शकलेले नाही. आता याच मुद्याच्या आधारे गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने उच्च न्यायालयात धाव घेऊन महापालिकेलाच न्यायालयात खेचले आहे. अर्थात, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही प्रदूषणाला तितकेच जबाबदार आहे. गोदावरी संरक्षणासाठी न्यायालयाने अनेक उपाययोजना करण्याचे आदेश देऊनही प्रशासनाकडून मात्र त्याचे अद्याप पालन होऊ शकलेले नाही. साबरमती नदीच्या धर्तीवर गोदावरी नदीवर संरक्षक भिंत उभारण्यासाठी गेल्या पाच ते सात वर्षांपासून निधीची तरतूद करण्यात आली. परंतु त्याबाबतही निर्णय झालेला नाही. गोदापार्कसाठी भूसंपादनाचा प्रश्नही वर्षानुवर्ष भिजत पडलेला आहे. यासाठी कधीही लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झालेले नाहीत. केवळ निधी नाही म्हणून भूसंपादन रखडले. असे नाही तर गोदापार्कच्या मार्गात येणार्‍या मिळकतधारकांना वाढीव एफएसआय व टीडीआर देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले असते तर भूसंपादनाचा प्रश्न कधीही निर्माण झाला नसता. मात्र, फक्त राजकीय हेतूनेच या मुद्याकडे पाहून हा प्रश्न प्रलंबित ठेवला गेल्याचे दिसते.

गोदावरीची स्थिती अधिक चांगली
साबरमती नदीकडे आदर्श म्हणून पाहिले जात असले तरी कधीकाळी या नदीची अवस्था गोदावरी नदीपेक्षाही बिकट होती. नदीच्या काठांवर मोठमोठय़ा झोपडपट्टया वसलेल्या होत्या. शहरातील दोन्ही बाजुला सांडपाणी नदीमध्ये मिसळत होते. यामुळे या दोन्ही बाबींचे आव्हान स्वीकारून अहमदाबाद महानगरपालिकेने 2005 पासून साबरमती रिव्हरफ्रंट हा अभिनव उपक्रम हाती घेतला. आजमितीस हा प्रकल्प यशस्वीपणे उभा असून, त्याला एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून दर्जा मिळाला आहे.

(फोटो- साबरमती नदीकाठी साकारण्यात आलेल्या रिव्हरफ्रंट)