आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाप्रकल्पासाठी आतापर्यंत 40 कोटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रिलायन्स उद्योगसमूहामुळे चर्चेत आलेल्या गोदापार्क प्रकल्पाविषयी तर्कवितर्क लढविले जात असून, या प्रकल्पामुळे महापालिकेच्या पदरी काय पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे 40 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पाबाबत विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्यानेच येत्या पंधरा दिवसांत या प्रकल्पाचे अख्ख्या नाशिककरांसाठी महाकवी कालिदास कलामंदिरात सादरीकरण करण्याची तयारीही मनसेने केली आहे.

शिवसेना- भाजपच्या काळातील बहुचर्चित असलेला गोदापार्क प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मनसेने रिलायन्सला साकडे घातल्याने हा प्रकल्प एकदमच पुन्हा चर्चेत आला आहे. प्रकल्पासाठी महापालिका जागा हस्तांतरित करणार असल्याच्या तसेच या विषयाचे जादा विषयात समावेश केल्याने प्रकल्पाविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

यामुळेच विरोधकांना उत्तर देण्यासाठी मनसेने या संपूर्ण प्रकल्पाचे तांत्रिक बाबींसह सविस्तर सादरीकरण करण्याचाच निर्णय घेतला असून, त्याद्वारे लोकप्रतिनिधींसह नाशिककरांना हा प्रकल्प खुला करून दिला जाणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पासह गोदाघाट सुशोभीकरणावर महापालिकेने 40 कोटींचा खर्च केला आहे. यामुळे झालेला खर्चही आता चर्चेत येणार आहे. हा खर्च वाया जाऊ नये, यासाठीदेखील प्रशासन रिलायन्स समूहाकडून हा प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी अनुकूल आहे.

करारनाम्यातील महत्त्वाच्या अटी
1> प्रकल्पाची जागा हस्तांतरित केली जाणार नाही. तसेच, कोणत्याही प्रकारचे दान, लिज करारादरम्यान आणि त्यानंतरही संबंधित कंपनीला केले जाणार नाही.
2> भविष्यात नदीला आलेल्या पुरामुळे होणारे नुकसान वा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यास महापालिका जबाबदार राहणार नाही.
3> प्रकल्पासाठीची जागा वापराच्या बदल्यात त्यावर संबंधित कंपनीला त्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज काढता येणार नाही. तसेच, त्यावर पोटभाडेकरू टाकण्याचाही अधिकार राहणार नाही.
4> प्रकल्पासाठी नेमल्या जाणार्‍या कर्मचार्‍यांसाठी नियमाप्रमाणे वेतन, भत्ते, भविष्यनिर्वाह निधी इ. द्यावे लागेल.

प्रकल्पाची सद्यस्थिती
1> नदीच्या तीरावर घारपुरे घाट ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत भागातील सुमारे 2250 मी. लांबीच्या गोदापार्कचे काम 2002-04 या काळात करण्यात आले आहे.
2> गोदावरीच्या डाव्या तीरावरील रामवाडी पूल ते व्हिक्टोरिया पुलादरम्यान सुमारे 650 मी. लांबीचे या प्रकल्पाचे काम 2002-04 पर्यंत पूर्ण झाले आहे.
3> फॉरेस्ट नर्सरी पूल ते आसारामबापू पुलादरम्यान भागातील डाव्या तीरावरील 1000 हजार मी. लांबीची जागा पालिकेच्या ताब्यात असून, तेथे लगेचच काम सुरू करण्याचे नियोजन आहे.

गोदापार्क प्रकल्पाचा उद्देश
1> गोदावरी नदी किनार्‍याचे संरक्षण करणे
2> आबालवृद्धांसाठी जॉगिंग ट्रॅक, हेल्थ क्लब, वॉटर स्पोर्ट्स
3> पार्किंग झोनची उभारणी करणे
4> नदी किनार्‍यावर फूट ब्रिज निर्माण करणे
5> दुर्मिळ फुलांचे उद्यान व हिरवळ तयार करणे
6> वृक्षांची तोड न करता त्याचा कलात्मक उपयोग करणे
7> वॉटर पार्क व संगीत कारंजे तयार करणे
8> विविध ठिकाणी बोटिंगची व्यवस्था करणे
9> बालगोपाळांसाठी चिल्ड्रन पार्क तयार करणे
10> वृद्धांसाठी नाना-नानी पार्क तयार करणे
11> मनोरंजनासाठी मोनोरेल व लेझर शोज
12> उंच टेकडी निर्माण करून त्यावर प्रेक्षक गॅलरी उभारणे