नाशिक - गोदावरी नदीचे पात्र संकुचित करणार्या घाट बांधकामात पाटबंधारे विभागाने महापालिकेला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करीत घाट मागे सरकविण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटाचे बांधकाम सुरू असून, या कामाच्या पाहणीप्रसंगी शनिवारी गोडसे बोलत होते. तांत्रिकदृष्ट्या घाट बांधकाम सयुक्तिक आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी पाटबंधारे व पालिका अधिकार्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याची सूचनाही खासदार हेमंत गोडसे व उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. कन्नमवार पुलाजवळील कामाच्या पाहणीनंतर दौर्याची सांगता झाली. टाळकुटेश्वर पूल ते लक्ष्मीनारायण मंदिरादरम्यान कामे सुरू असून, त्यामुळे गोदापात्र संकुचित झाल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी केला होता. त्यास उपमहापौर सतीश कुलकर्णी व गंगा-गोदावरी पुरोहित संघाने सहमती दर्शवत विरोध केला. गायकवाड यांच्या सूचनेवरून गोडसे, कुलकर्णी यांच्यासह प्रभाग सभापती प्रा. कुणाल वाघ, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, नगरसेवक शैलेश ढगे यांनी या कामांची पाहणी केली. या वेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सागर शिंदे उपस्थित होते.
नदीपात्र मोकळेच, भराव खाली दबणार
सद्यस्थितीत गोदावरीतील भराव बघितला तर निम्मे पात्र दबल्याचे स्पष्ट दिसते, असे गोडसे यांनी सांगितले. त्यावर शिंदे यांनी गोदावरीचे पात्र 50 मीटर असून, त्यात कुठेही अतिक्रमण केले नसल्याचे सांगितले. घाटाचे काम करताना नदीत पाइलिंग करावे लागणार असून, त्यासाठी सद्यस्थितीत भराव टाकला आहे. पुढील कामकाजात घाट जवळपास 60 फूट उंच उचलला जाणार असून, त्यात हाच भराव खाली जाणार आहे. त्यामुळे नदीपात्र व्यापले जाणार असून, उतरत्या पायर्यांसाठी भराव महत्त्वाचा असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यानंतर कुलकर्णी व वाघ यांनी पुराच्या पार्श्वभूमीवर घाटाची उंची बरोबर आहे का, अशी विचारणा केली. त्यावर शिंदे यांनी दहा वर्षांत आलेल्या पूरपातळीचा अभ्यास करून घाट बांधला जात असल्याचे स्पष्ट केले.
तांत्रिक अभ्यासामुळे दौरा ‘पाण्यात’
गोदावरी पात्रात स्पष्टपणे भराव दिसत असतानाही अधिकार्यांपुढे आपले म्हणणे मांडण्यात सर्वच लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे दिसून आले. शिंदे यांनी 50 मीटर गोदावरीचे पात्र सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. मात्र, पूररेषेत नेमके किती क्षेत्र, लाल व निळ्या रंगात मोडणारे क्षेत्र, याची पुरेशी माहिती नसल्यामुळे अभियंत्यांना कोंडीत पकडणे शक्य झाले नाही. सावजी यांनी मात्र चाणाक्षपणे महापालिका अधिकार्यांच्या कोर्टात चेंडू टोलवत तांत्रिक माहिती नसल्यामुळे एकत्रित बैठकीचा तोडगा काढला.
गोदाघाटाचे सुशोभीकरणही गरजेचे
गोदावरी किनार्यावरील घाटविकासाचे काम मागे सरकवणे गरजेचे असून, या ठिकाणी सुशोभीकरण करणे गरजेचे आहे. काँक्रिटीकरणामुळे गोदाघाटाचे आकर्षण कमी होईल. त्यासाठी जागा सोडून तेथे उद्यान व अन्य शोभेच्या वस्तू लावण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणी तांत्रिक अभ्यास करण्यासाठी महापालिकेत बैठक आयोजित केली जाईल.
हेमंत गोडसे, खासदार, शिवसेना