आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाप्रदूषण प्रकरणी तत्काळ उपाययोजनांचे महापौरांचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गोदापात्रातील प्रदूषण प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात न्यायालयाने महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ यांना उपाययोजनेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेकडून प्राथमिक स्तरावर उपाय केले जात असले, तरी त्यात सातत्य नसल्याने अद्यापही गोदावरी नदीचे प्रदूषण तसूभरही कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर गोदावरी गटारीकरणविरोधी मंचच्या कार्यकर्त्यांसोबत महापौरांनी बुधवारी (दि. 1) गोदापात्राची पाहणी करीत तत्काळ विविध उपाययोजना करण्याचे आदेश दिले. सोमेश्वर ते दसक-पंचकपर्यंत संबंधित खात्यांच्या अधिकार्‍यांसोबतही एक सविस्तर दौरा केला जाणार असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले.
गोदावरी गटारीकरणविरोधी मंचचे कार्यकर्ते व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या अनुषंगाने महापौरांनी ‘रामायण’ येथे बैठक बोलावली होती. त्यात नदीत सोडले जाणारे सांडपाणी तत्काळ थांबविण्याची मागणी राजेश पंडित यांनी केली. तपोवनातील ‘एसटीपी’तून प्रक्रिया करून नदीत सोडल्या जाणार्‍या पाण्यापासून फेस निर्माण होत असल्याने पिकांवर विपरित परिणाम होत असल्याचे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बैठकीनंतर महापौर व मंचच्या कार्यकर्त्यांनी टाळकुटेश्वर परिसराची पाहणी केली. त्यात जुने नाशिक भागातील मलयुक्त, तसेच इतर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचे दिसून आले. महापौरांनी येत्या काही दिवसांत गोदावरी संबंधित सर्वच विभागांचा पाहणी दौरा आखला जाईल, असे आश्वासन दिले. मंचचे निशिकांत पगारे, शिरीष दंदणे, सुनील मेंढेकर, उदय थोरात, प्रकाश वाजपेयी, राहुल पाटील, नितीन हिंगमिरे, नितीन रुईकर, जसबीर सिंग, नगरसेवक सुदाम कोंबडे, मनविसेचे मुकेश शहाणे उपस्थित होते.
महिनाभरात अंमलबजावणी
महापौरांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे, सहायक आरोग्य अधिकारी सचिन हिरे, कार्यकारी अभियंता वंजारी यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना पाहणीदरम्यान केल्या. त्यात चोपडा लॉन्स येथील पूल, घारपुरे घाट, अहिल्याबाई होळकर पूल, तसेच संत गाडगे महाराज पुलाच्या दोन्ही काठांवर जाळ्या बसविण्याचे व दोन्ही बाजूंना निर्माल्य कलश ठेवण्यास सांगितले. महिनाभरात ही कार्यवाही करण्यात येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.