नाशिक- गोदावरी शिक्षण मंडळ संचलित एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वतीने जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ औषधनिर्मात्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न औषध प्रशासन निरीक्षक संदीप नरावणे हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रवीण हरक, प्राचार्य डी. के. पाटील, गिरीश पाटील, सुनीता महाले आदी उपस्थित होते.
रुग्ण आणि डॉक्टर यांच्या दुवा म्हणून सेवाकार्य करणाऱ्या औषध निर्मात्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या योगदानाची दखल घेऊन संस्थेच्या वतीने ज्येष्ठ औषधनिर्मात्यांचा सत्कार करण्यात आला आहे. राज्य औषधनिर्माण परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, सुभाष छाजेड, महेंद्र शहा, मेहबूब खान, योगेश बागरेचा, अभय शिरुडे, उपेंद्र दिनानी, संजय चकोर यांचा सन्मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी फार्मसीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून करिअरच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमासाठी शुभांगी बिचेवार, दर्शना शिंदे, सुशांत हुमने, श्वेता भावसार यांनी प्रयत्न केले.
रुग्णाच्याआरोग्यहिताचा घेतला मी वसा.. :जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित फार्मसी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप डेर्ले यांनी सर्व विद्यार्थ्यांना "मी फार्मासिस्ट-रुग्णाच्या आरोग्य हिताचा घेतला मी वसा, आरोग्य क्षेत्रात उमटवेन मी ठसा', ही प्रतिज्ञा दिली. फार्मसिस्टची समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि कर्तव्य यांची माहिती डॉ. डेर्ले यांनी या वेळी दिली, तर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. एस. आर. भालेराव यांनी "मूल्य जीवन शिक्षण कर्तव्य आणि जबाबदारी' विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या वेळी औषधी वनस्पतींची वृक्षलागवड करण्यात आली. या वेळी प्राध्यापक डॉ. अशोक पिंगळे यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त प्राचार्य डी. के. पाटील यांच्या हस्ते योगेश बागरेचा यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.
जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त केमिस्ट असोसिएशनतर्फे महिला फार्मसिस्टचा नारी शक्ती सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सुमारे ३७ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप शेवाळे, सचिव हिरालाल पाटील, सुरेश पाटील, विनोद बाविस्कर, योगेश कदम, महेश भावसार, किशोर बगदे आदी उपस्थित होते. श्री महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातर्फे फार्मसिस्ट दिनानिमित्त शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. गोल्फ क्लबपासून पायी रॅलीला प्रारंभ झाला. राजीव गांधी भवन, सीबीएस पुन्हा गोल्फ क्लबजवळ रॅलीचा समारोप झाला. या वेळी राहुल सबनीस, प्राचार्य ए. एम. देशपांडे, ए. एम. पिचा, अनघा सर्वेज्ञ उपस्थित होते.