आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निश्चयाने होई.. स्वच्छ गोदामाई.., राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी राबविला उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक -
करोत कोणी अस्थी विसर्जन..
पखाल किंवा कलश हिरण्मय
आक्रमीते निजपंथ सरिता
करिते का कधी खंत..
काठावरचं सगळं आपल्या पोटात घेणारी नदी आपणच किती दूषित करतो आहोत याच मार्मिक चित्रण कवी यशवंतांनी आपल्या कवितेत करून ठेवलं आहे. हेच चित्र आपल्या गोदेच्या बाबतीतही बघायला मिळतं. म्हणूनच त्या गोदास्वच्छतेसाठी मातोश्री कॉलेजचे विद्यार्थी आणि गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे सदस्यही सरसावत त्यांनी आज स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अभिनेता चिन्मय उद्गीरकरही उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता.

हरितकुंभ योजनेला प्रतिसाद देत मातोश्री महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रामकुंड ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत गोदा स्वच्छता अभियान राबवले. या वेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य, मानवी शंृखला आणि फेरीतूनही जनजागृती केली. विशेष म्हणजे गोदा काठावरील सर्व घाण गोळा करताना या मुलांना कसलीही लाज, किळस वाटत नव्हती, ही आपली गोदा आहे ती स्वच्छ ठेवलीच पाहिजे या भावनेने सर्व विद्यार्थी उत्साहाने काम करत होते. त्यांचा हा उत्साह वाढविण्यासाठी अभिनेता चिन्मयही स्वच्छता मोहिमेत उतरला. त्यानेही स्वत: मोठा भाग स्वच्छ केला, तर मंचचे सदस्यही जनजागृती करत होते. या वेळी मातोश्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. के. खराटे, उपप्राचार्या वर्षा पाटील, कुणाल दराडे उपस्थित होते.
इट्स अ सिंपल गिव्ह अँण्ड टेक
आम्ही पर्यावरण दिनी गोदा स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. प्रशासन त्याच्या पातळीवर जे करायचे ते करेलच पण नागरिकांनी यात सहभागी होण्याची गरज आहे. त्यातही युवाशक्त महत्त्वाची आहे. तेच काहीतरी करु शकतील. म्हणूनच आम्ही शाळांमध्ये जागृती केली. मातोश्री कॉलेज त्यापैकीच एक. या विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व कळलं आणि त्यांनी खुप चांगल्या पद्धतीने गोदा स्वच्छ केली. अतिशय नम्र भाषेत ही मुलं नागरिकांशी संवाद साधत होते. आता हे लोकांना कळणं महत्त्वाचं आहे. तेव्हा 25 होतो, आज 250 झालो, लवकरच 2500 होऊन आणि कुंभमेळ्यापर्यंत सर्वच जण गोदा स्वच्छतेसाठी पुढाकार घेतील असा विश्वास आहे. यासाठी आमचा हेतू काहीच नाही. आपण गोदेला सेव्ह केलं तर ती आपल्याला करेल. इट्स अ सिंपल गिव्ह अँण्ड टेक. - चिन्मय उद्गिरकर, अभिनेता

प्रशासन मात्र उदासीनच..
आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाकडून हरित कुंभ संकल्पनेचं नियोजन करण्यात येत आहे. पण, केवळ कागदी घोडे नाचवून उपयोग नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. ती कृती आज मंचचे सदस्य आणि या मातोश्री महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. प्रशासन मात्र प्रत्यक्ष कृतीसाठी उदासीन असते. निशिकांत पगारे, अध्यक्ष, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच.

हे ऐकतात, अन् सोडून देतात..
गोदावरी स्वच्छता मोहिमेप्रसंगी मातोश्री महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी रामकुंड परिसरात कपडे, वाहने धुणार्‍या नागरिकांना गोदाप्रदूषणाविषयी प्रबोधन केले. याठिकाणी कपडे धुतल्यामुळे होणारे दुष्परिणाम त्यांनी या महिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, कपडे धुणार्‍या या महिलांनी ते समजावून घेण्याबाबत उदासीनताच दाखविली. विशेष म्हणजे, काही महिलांनी तर या विद्यार्थिनींनाच उलट प्रश्न करीत त्यांनाच अनेक उपदेश देण्यास सुरुवात केली. मातोश्री महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी राबविला उपक्रम