आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Godavari River News In Marathi, Death Fish, Divya Marathi, Health Issue, Nashik

गोदावरीच्या पात्रात हजारो मासे मृतावस्थेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव - नांदूरमध्यमेश्वर धरणापासून जवळ असलेल्या निफाड तालुक्यातील तामसवाडी, तारुखेडले येथील गोदावरीच्या पाण्यात हजारो मासे मृतावस्थेत सापडले आहेत. आठवड्यापासून येथे मासे मृतावस्थेत आढळत होते. परंतु, आता ही संख्या झपाट्याने वाढत आहे. यामागील कारण अस्पष्ट असून, मध्यंतरी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात काही पक्षी मृतावस्थेत सापडल्याने परिसरात वेगळी चर्चाही सुरू आहे. मृत मासे सडत असल्याने त्याची दुर्गंधी सुटली असून, आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.
गारपिटीने या परिसराला काही दिवसांपूर्वीच झोडपून काढले होते. यातून बाहेर पडत नाही तोच मृत माशांमुळे दुर्गंधी सुटल्याने परिसरातील जनावरेही पाणी पित नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. दुसरीकडे मच्छीमारांची संख्या येथे वाढली असून, ठिकठिकाणी मासे पकडण्याचे काम येथे जोरात सुरू आहे. यापूर्वी कधीही असा प्रकार झाला नसल्याचे शेतकरी सांगतात. नांदूरमध्यमेश्वर धरणाजवळ पाणीसाठा अत्यंत कमी आहे. हे पाणी सोडून सुमारे तीन महिने झाल्याची माहिती आहे. मात्र, धरणाजवळ मासे मृत झाल्याची परिस्थिती नाही, असे पाटबंधारे विभागातील वायरलेस ऑपरेटर कातकाडे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी मात्र उपलब्ध नव्हते.