आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तरी गोदावरी नदी प्रदूषितच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक महापालिकेची स्थापना होऊन 18 वर्षे उलटले. 600 कोटी रुपये खर्च झाले. मात्र गोदावरीला गटारीतून मुक्त करून शुचिर्भूत करण्यात अजूनही यश मिळालेच नाही. उच्च न्यायालयात बुधवारी होणार्‍या सुनावणीत
महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने 15 जूनपर्यंत सुधारणेसाठी मागितलेल्या मुदतीबाबत काय निर्णय होतो, याकडे आता नाशिकसह मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

गोदावरीच्या वाढत जाणार्‍या प्रदूषणामागे अनेक कारणे उघड झाली आहेत. पाणीटंचाईमुळे गोदावरीच्या मूळ प्रवाहालाच घातला गेलेला बांध, मुख्य प्रवाहातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांमुळे पात्राचा झालेला संकोच व त्यात लाखो लिटर सांडपाण्याचा दररोज येणारा प्रवाह यामुळे पवित्र गोदावरीची गटारगंगाच झाली आहे. त्यावर उपाय म्हणून प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पाठवलेला गोदावरी कृती आराखडा तब्बल दोन वर्षांपासून शासनदरबारी भिजत पडला असून, गोदावरी गटारीकरणविरोधी मंचसारख्या सामाजिक संस्था उच्च न्यायालयात गेल्यानंतर केवळ सफाईसारख्या योजनांवर भर दिला जात असला तरी प्रदूषणाला हातभार लावणार्‍या मुख्य स्रोतांकडे मात्र दुर्लक्षच झाले आहे.

पुढे काय ?
विशिष्ट कालावधीत गोदावरी प्रदूषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेची अर्थातच मेरीची मदत घेण्याचा विचार सुरू असल्याचे उच्च न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटले आहे. या संस्थेकडून गोदावरी प्रदूषणाच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर ठोस उपाय केले जातील. तोपर्यंत नाशिक महापालिका गंगा प्रदूषणाचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात येणार आहेत.

त्र्यंबकेश्वर ते गंगापूर धरण
त्र्यंबकेश्वर ते गंगापूर धरण या जवळपास 20 किलोमीटर अंतरात गोदामाई संथ वाहते. हे पाणी नैसर्गिक आहे, असे नाही. या पाण्यात त्र्यंबकेश्वरमधून रोज बाहेर पडणारे जवळपास तीन दशलक्ष लिटर मलजलही मिसळते. मात्र, हेच पाणी गंगापूर धरणात आल्यानंतर स्वच्छ आणि शुचिर्भूत झाल्याचा प्रत्यय येतो. के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या पर्यावरण शास्त्रीय विभागाच्या एक्सपर्ट टीमसोबत पाणी नमुने घेऊन तपासणी केल्यानंतर त्यात कोणतेही हानिकारक द्रव्य आढळले नाही. उन्हाळ्यामुळे व पाणीसाठा कमी झाल्यामुळे विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण किमान पातळीइतकेच आढळले. हा ऑक्सिजन कमी झाला तर जलसाखळी धोक्यात येऊ शकते.

घातक असून तरीही
केटीएचएम महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण नलावडे यांनी सांगितलेला प्रकार अत्यंत गंभीर व गोदावरी प्रदूषणाला कसा घातक आहे, यावर प्रकाशझोत टाकतो. मध्यंतरी गोदावरीत पाणवेलींचे प्रमाण वाढले होते. याबरोबरच गोदेच्या पाण्यावर हिरवा तवंगही आला होता. हा तवंग अर्थातच अजोल ही वनस्पती पर्यावरण विभागाने घेतली व तातडीने पालिकेच्या नळतून येणार्‍या पाण्यातील एका पेटीत ठेवली. दुसर्‍या दिवशी सकाळी ही पेटी बघितली तर वनस्पती अक्षरश: सुकून गेली होती. याचाच अर्थ स्वच्छ पाण्यात जगणार्‍या वनस्पती गोदावरीत जगूच शकत नाहीत.

गंगापूर धरण ते तपोवन
गंगापूर धरण ते तपोवन या गोदामाईच्या पात्रात पाणी कमी आणि मलजलच अधिक आढळले. 80 टक्के सांडपाणी पुनर्प्रक्रियेसाठी वापरतो, असा दावा करणार्‍या पालिकेचे पितळही यामुळे उघडे पडले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने उच्च् न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 40 टक्के सांडपाणी गोदावरीत जात असल्याचा निष्कर्ष काढला आहे. गंगापूर धरणापासून सोमेश्वर, आनंदवलीचा पूल, आसारामबापू आश्रमाजवळील पात्र, चोपडा लॉन्स, घारपुरे घाट, गाडगे महाराज पूल, तपोवन अशा अनेक ठिकाणी गोदावरीत मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा अंश आढळला आहे.

असे असतील प्रस्ताव
1) नदीच्या प्रवाहात मिसळणारे सर्व नाले 15 जून 2013 पर्यंत स्थलांतरित केले जातील. 2) महापालिकेत पर्यावरण विभाग सुरू करून तेथे विशेष तज्ज्ञांची नियुक्ती करावी. 4) सांडपाणी गळती थांबवण्यासाठी दक्षता पथकाची नेमणूक होणार. 5) गोदावरीचा प्रवाह वाहता राहील यासाठी कायम थोडे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाशी चर्चा करून निर्णय होणार.