आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरीचे होणार आता संवर्धन; पालिकेकडून स्वतंत्र विभागास मंजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गोदावरी प्रदूषणाविषयी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट सुशोभीकरण आणि प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याकरिता महापालिकेने ‘गोदावरी नदी संवर्धन विभाग’ निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या प्रधान सचिवांकडे नुकताच सादर करण्यात आला आहे.

शहराचे औद्योगीकरण आणि नागरीकरण वाढल्यामुळे दिवसेंदिवस नदीपात्रात घनकचरा, सांडपाणी, सॅनिटेशन, पूजेचे विविध साहित्य, पाणवेली इत्यादी पडत आहे. त्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. यामुळे रामघाट परिसर व शहरातील संपूर्ण नदीपात्र व त्यालगतच्या दोन्ही बाजूंचा नदीकिनारा प्रदूषणमुक्त आणि सुंदर करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी एक स्वतंत्र विभागच निर्माण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने महासभेने केलेल्या ठरावानुसार, गोदावरी नदी संवर्धन विभाग निर्माण केला जाणार आहे. गोदावरी नदी सातपूर, पश्चिम, पंचवटी व पूर्व या चार विभागातून वाहते. रामकुंड परिसर हा प्रामुख्याने पंचवटी विभागीय कार्यालयांतर्गत येतो. त्याअनुषंगाने गोदावरीसाठी गोदावरी संवर्धन विभाग हा नवीन विभाग निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली असून, आयुक्त संजय खंदारे यांनी 20 फेब्रुवारी 2013 रोजी हा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे मान्यतेसाठी सादर केला आहे.

विभागाची जबाबदारी

> घनकचरा, सांडपाणी, पाणवेली इ. कामे करणे

> धार्मिक विधी होणार्‍या ठिकाणी नियमित स्वच्छता करणे

> सांडपाणी रोखण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करणे

> सांडपाणी वाहून नेणार्‍या वाहिन्यांची दुरुस्ती

> घाट, कोट, संरक्षक भिंत, गोदापार्कची देखभाल

> अतिक्रमण रोखणे व कायदेशीर कारवाई करणे

> नदीकिनारी वृक्षारोपण व सुशोभीकरण करणे

> देश-परदेशातील नद्यांचा अभ्यास करणे व उपक्रम हाती घेणे

> सिंहस्थ कुंभमेळ्याच्यादृष्टीने नियोजन करणे

> पूररेषेच्या अनुषंगाने नवीन कामांचे नियोजन

विभागाचे कार्यक्षेत्र
गोदावरी नदीचे पात्र व त्याच्या दोन्ही बाजूंकडील प्रत्येकी 100 फुटांच्या किनार्‍याचा परिसर या विभागाच्या कार्यक्षेत्रात राहील. त्यात नदीपात्र, घाट, सांडवे, पूल व पुलाचा पोहोच रस्ता इत्यादी भागाचा समावेश राहणार आहे.

विभागाचे कर्मचारी व अधिकारी
अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता (पर्यावरण), उपअभियंता (यांत्रिकी), लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, मिस्त्री, विभागीय अधिकारी, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, गंगापट्टेवाले, सुरक्षारक्षक, सफाई कामगार असे विविध 176 पदसंख्या या स्वतंत्र विभागासाठी सुचविण्यात आली आहे. सरळसेवेने किंवा पदोन्नतीने या पदांकरिता नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे.