आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Godavari River Pollution, Latest News In Divya Marathi

दोन वर्षांत करणार गोदावरी प्रदूषणमुक्त- आयुक्त संजय खंदारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पाण्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याने सांडपाणी, तसेच मलजलाचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे जलशुद्धीकरणाचे मोठे आव्हान आहे. परंतु, पुढील दोन वर्षांत 100 टक्के शुद्धीकरणाची प्रक्रिया करून गोदावरी प्रदुषणमुक्त केली जाईल, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त संजय खंदारे यांनी जागतिक जलदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) लोकल सेंटर व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनिअर्स हॉलमध्ये ‘पाणी आणि ऊर्जा’ विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. खंदारे पुढे म्हणाले की, पाणी व विजेचे साठे र्मयादित आहेत. पाण्यावरून वाद निर्माण होऊ लागले आहेत. पाण्याचे महत्त्व मोठे असून, त्याच्या बचतीची गरज आहे. वीज व पाणी यांचा जवळचा संबंध असून, त्यांची बचत म्हणजेच निर्मिती असल्याने समाजात प्रबोधन करण्याची गरज आहे.
ओमप्रकाश कुलकर्णी यांनी विजेचे महत्त्व सांगितले. वीज आणि पाणी हे दैनंदिन वापरातील महत्त्वाचे घटक असल्याने या दोन्हींची बचत करण्याची सवय अंगवळणी पडायला हवी, असेही ते म्हणाले. आर. के. पवार यांनी शहरातील भविष्यातील पाणीपुरवठय़ाच्या नियोजनाविषयी माहिती सांगितली.
सिंहस्थाला होणार प्रदूषणाची बाधा?
पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी साधू-महंतांसह लाखो भाविक गोदातीरी येणार आहेत. परंतु, गोदावरी प्रदूषणमुक्त होण्यास दोन वर्षे लागतील, असे खुद्द पालिका आयुक्त संजय खंदारे यांनी सांगितल्याने कुंभमेळ्याची पर्वणी प्रदूषित पाण्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याचे प्रयत्न होत असले तरी शुद्धीकरणाची व्यवस्था अद्यापही सक्षम झालेली नाही. त्यामुळे पुढील वर्षभरात शुद्धीकरणाचे प्रकल्प सुरू करण्याचे आव्हान पालिकेपुढे राहणार आहे.