आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटारीच्या पाण्याने गोदावरी होतेय दूषित; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक शहर हे पावनभूमी, मंत्रभूमी म्हणून मानले जाते. रामाच्या वास्तव्यामुळे शहराला वेगळेच महत्त्व आहे. काळाराम मंदिरात राज्यातील तसेच परराज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच अस्थी विसर्जनासाठीही दूरवरून नागरिक येत असतात. परंतु, चोपडा लॉन्सजवळ गटारीचे पाणी गोदावरीत सोडले जात असल्याने गंगेचे पाणी दूषित होत आहे.
हे दूषित पाणी रामकुंडात जात असल्याने अनेक भाविकांना दूषित पाण्यात स्नान करावे लागते. त्याचप्रमाणे हे गंगेचे पाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने तीर्थ म्हणून पितात. मात्र, अशा प्रकारे गटारीचे पाणी नदीत सोडून महापालिका प्रशासन भाविकांच्या भावनाशी खेळत आहे. पालिकेने गोदावरीत सोडलेल्या गटारीच्या पाण्यामुळे अनेक गंभीर समस्या उद््भवण्याची शक्यता आहे. कारण गोदावरीचे पाणी हे केवळ नाशिक शहरापुरतेच नाही तर पुढे अनेक गावांना जाते. त्यामुळेच याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
पर्यटकांना रोगराई होण्याची शक्यता - दूषित पाण्यामुळे जलचरांना जीवाला मुकावे लागत आहे. तसेच पर्यटकांनाही रोगराई होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने हे दूषित पाणी सोडण्याचे त्वरित बंद केले पाहिजे. - अशोक निकाळजे, स्थानिक
अंगावर शहारे आणणारे - गटारीचे पाणी गोदावरीत सोडल्याचे चित्र पाहताना अंगावर शहारे येतात. हे आम्ही नेहमी पाहात असल्याने नदीत अंघोळीला जात नाही. - सागर पगारे, स्थानिक