आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदा प्रदूषणाविरोधात निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-शहरातील सांडपाणी गोदावरीत सोडण्याची योजना बंद केली नाही तर ‘आम आदमी’ पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोमवारी देण्यात आला. गोदावरी प्रदूषणाचा निषेध करण्यासाठी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी निवेदनही दिले.

गोदावरी गटारीकरणविरोधी मंचच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी ‘आप’ने महापालिकेसमोर आंदोलन केले. गोदावरीत थेट सांडपाणी सोडणे, निर्माल्य नदीत टाकणे, गाड्या व कपडे धुणे, प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सांडपाणी प्रक्रिया करणारा प्रकल्प तयार करून ते पाणी वीजनिर्मिती प्रकल्प वा कृषीसाठी दिले पाहिजे. याबरोबरच 40 मायक्रॉनपेक्षा पातळ पिशव्यांवर बंदी घातली पाहिजे. निर्माल्य कलशांची संख्या वाढवून ते गोळा करण्यासाठी महापालिकेने प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच गोदावरीत कपडे व गाड्या धुणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’च्या निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी समन्वयक जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, जगबिर सिंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिस कोठे गेले?
गोदावरी प्रदूषित करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी उच्च् न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांची नेमणूक करण्यात आली. प्रत्यक्षात चार दिवस पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर मात्र अपुर्‍या मनुष्यबळाचे कारण देत बंदोबस्त काढून घेण्यात आला. न्यायालयाचा अवमान करण्यासारखी बाब असून, कोणाचाच प्रतिबंध नसल्यामुळे गोदा प्रदूषण वाढत आहे. जितेंद्र भावे, जिल्हा समन्वयक, ‘आप’