गोदावरीचे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी केवळ लोकप्रतिनिधींचीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनीही त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अर्थात नदीपात्रात सोडल्या जाणा-या सांडपाण्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रक्रिया केलेले व प्रक्रिया न केलेल्या पाण्यातून प्रदूषण होत आहे, असे वेगवेगळ्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वप्रथम मलनिस्सारण केंद्रां (एसटीपी) च्या व्यवस्थेत सुधारणा होणे गरजेचे आहे.
याशिवाय नदीपात्राजवळ म्हणजेच पूररेषेच्या आत यापुढे इमारत बांधकाम करण्यास काटेकोरपणे मज्जाव व्हायला हवा. महासभेतही पुन्हा तशा प्रकारचा ठराव करण्यात यावा, अशी अपेक्षा ‘दिव्य मराठी’च्या वतीने आयोजित राउंड टेबल चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. सिंहस्थाच्या आत गोदावरी प्रदूषणमुक्त होणे शक्य आहे. गोदावरीचे पाणी इतके शुद्ध व्हायला हवे की, त्यात स्नान करता यायला हवे, ते पिता यावे आणि आचमन करण्यायोग्य व्हावे, असा सूरही या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.
निर्णायक अवस्था आली
- सामाजिक आरोग्य हे गोदावरी नदीवर अवलंबून आहे, हे प्रथमत: सर्वांनी जाणून घ्यावे. आपण जे पाणी पितो त्यात मलमूत्र विसर्जित करतो आणि तेच पाणी पुन्हा पितो हेदेखील लक्षात घ्यावे. ठेकेदारनिहाय लोकशाही प्रणालीत एसटीपी प्रकल्प अडकलेले दिसतात. या प्रकल्पांना त्यातून बाहेर काढण्याचे काम लोकप्रतिनिधींचेच आहे. पण, या लोकप्रतिनिधींनी गोदावरी प्रदूषित करणा-यांना का रोखले नाही? ठेकेदारी पोसण्यावर मी फार बोलणार नाही. पण, समाजहितही जपण्याची जबाबदारी आपली आहे.
राजा, प्रजा आणि ऋषिमुनी एकत्र येऊन भविष्य सुधारण्यासाठी जेव्हा विचार मंथन करतात, तो क्षण कुंभाचा असतो. आज गोदावरीबाबत हे तीनही घटक एकत्र येऊन चर्चा करीत आहेत. ही उज्ज्वल भविष्याची नांदी समजावी. प्राणवायू जेव्हा सर्वाधिक असतो, तेव्हा कुंभमेळा भरतो. हा प्राणवायू वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नाशिकमधील राजकारणी उत्तर प्रदेश वा बिहारच्या तुलनेत अतिशय समजदार आहेत. ते चांगल्या मुद्यांसाठी आणि वाईटाचा नाश करण्यासाठी एकत्र येतात. गोदावरी प्रदूषण निर्मूलनासाठीही ही मंडळी एकत्र आल्याचे बघून आनंद होतोय. आता निर्णायक अवस्था आली आहे असे मला वाटते. यापुढील काळात गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवे. गोदावरीची जमीन नदीसाठीच असा निश्चिय करून पात्राजवळील जागेत इमारती न बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेणे गरजेचे आहे. पात्राच्या 200 मीटरपर्यंत प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन न जाण्याचा निर्णयही घ्यावा लागणार आहे. विशेषत: सिंहस्थकाळात या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सिंहस्थापूर्वीच नदीचे पाणी पिण्यायोग्य करणे आवश्यक आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह
गोदावरीचे पावित्र्य जपा...
प्रदूषणाचा राक्षस आज संपूर्ण जगालाच भेडसावत आहे. या राक्षसाला मारण्यासाठी आता एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. गोदावरी नदीकडे बघून ‘राम तेरी गंगा मैली’ म्हणण्याची वेळ आली आहे. यापूर्वी आम्हीही निर्माल्य नदीपात्रात विसर्जित करीत होतो. परंतु, आता हे निर्माल्य आम्ही संकलित करतो आणि ते शेतात टाकण्यासाठी शेतक-यांना आवाहन करतो. त्यानुसार शेतक-यांनी या निर्माल्याचा वापर केल्यास चांगले आरोग्यदायी अन्न पिकू शकते. खरे तर गोदावरी नदी ही धर्मशास्त्रानुसार पवित्र आहे.
त्यामुळे तिचे पावित्र्य हे जपलेच जायला हवे. नदीत गटारींचे पाणी सोडायलाच नको. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. आज आपण गोदावरीरुपी वसिहत जपून ठेवली नाही, तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी भगीरथ प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यावर केवळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. सर्वसामान्य नागरिक आणि भाविकांनीही आपली जबाबदारी ओळखून गोदावरीच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करायला हवे. गोदावरी स्वच्छ राहिली, तरच सिंहस्थाचे पावित्र्य जपले जाईल. पण, ती प्रदूषितच राहिली, तर स्नानासाठी येणा-या पाहुण्यांना आपण काय सांगणार? गोदावरी नदीत केरकचरा टाकू नये, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे नदीत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचेही विसर्जन होऊ नये. नदीतील मासे आणि अन्य जीवसृष्टीलाही जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार हिरावून घेण्याचे काम आपण करीत आहोत. यापुढे तरी नदीशी संबंधित जीवसृष्टी जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. नदीपात्राशेजारी वृक्षारोपण केल्यास ऑक्सिजनच्या पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे वृक्षारोपणावरही भर देण्यात यावा. सिंहस्थ जवळ आल्याने आता कृती करण्याची गरज आहे. स्वामी संविदानंद सरस्वती
गोदावरीसाठी विविध विकासकामांना सुरुवात
गोदा प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेतर्फे उपाययोजना केल्या जात आहेत. पाणवेलींमुळे गोदावरीचा श्वास कोंडला होता. पाणवेली काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या. त्यामुळे आता पाणवेलींमुळे होणारे प्रदूषण कमी झाले आहे. रामकुंडासह नदीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी नदीवर कपडे तसेच धुणी-भांडी धुणे बंद केले पाहिजे. महापालिका तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून, नदीवर कपडे धुण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. तसेच नदी पात्रात निर्माल्य तसेच कचरा टाकू नये, यासाठी नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षित जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. अॅड. राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती, नाशिक महापालिका
मलजल पूर्णत: शुद्धीकरणासाठी पालिका प्रयत्नशील
1995 ला सांडपाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. गेल्या सिंहस्थात 70 एमएलडी पाणी शुद्ध केले जात होते. सध्या 270 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. अपु-या मनुष्यबळामुळे एसटीपी ठेकेदाराकडे द्यावे लागते. डिसेंबरपर्यंत 342 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल. अर्थात गंगापूर, पिंपळगाव खांबच्या एसटीपीचे काम झाल्यावर आणखी 50 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होऊन एकूण 392 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होईल.
2021च्या लोकसंख्येला पूरक इतके हे पाणी असेल. आज प्रक्रिया केलेले पाणी एकलह-यापर्यंतच वापरले जाते. नांदूरमध्यमेश्वरपर्यंत ते अल्प प्रमाणात जाते. त्यामुळे शुद्ध पाण्यासाठी स्वतंत्र वाहिनी वा कालव्यांची कल्पनाही दीर्घकालीन उपाययोजनांचा भाग होऊ शकते.
यू. बी. पवार, अधीक्षक अभियंता, भूमिगत गटार योजना