आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदा रे गोपाळा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘गोविंदा रे गोपाळा..., यशोदेच्या तान्ह्या बाळा’ असे म्हणत उत्साही गोविंदांनी ठिकठिकाणी हंडी फोडली, तर ‘कृष्ण जन्मला गं सखी कृष्ण जन्मला’ असा पाळणा गात मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा झाला. अनेक मंदिरांमध्ये रविवारी रात्री 12 वाजता भाविकांनी कान्हाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होेती. विविध शाळांमध्येही चिमुकल्यांनी राधा-कृष्णाच्या वेशात दहीहंडी साजरी केली.
नाशिक - ढोल-ताशांचा गजर.. पाण्याचा फवारा.. गुलालाची उधळण... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात थरावर थर रचत नाशिकच्या गोविंदांनी दहीहंडी फोडली. गोकुळाष्टमीनिमित्त गंगापूररोड येथील युवा क्रांती संघाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. टँकरमधून होणारा पाण्याचा फवारा आणि गुलालाची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. गंगापूररोड येथील शहीद चौकात संघाच्या युवकांनी पहिली दहीहंडी फोडली. दहीहंडी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

गंगापूररोड व कॉलेजरोड परिसरात सात ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. शहीद चौक, आकाशवाणी केंद्र, प्रसाद सर्कल, शिवशक्ती चौक, दिवट्या-बुधल्या परिसर, टी. ए. कुलकर्णी चौक, बिग बाजार परिसर या ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आल्या. दरम्यान, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरिकांना त्याचा फटका बसला. दहीहंडीत मयूर वाणी, शशांक बेडेकर, अजय घोरपडे, मोहित पाटील यांच्यासह संघाचे युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुरक्षेला प्राधान्य
क्रांती संघाच्या युवकांनी तीन, चार व पाच थर रचून दहीहंडी फोडताना सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले होते. त्यामुळे उत्सवाला कोणतेही गालबोट लागले नाही. दहीहंडी फोडताना कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.