आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनसाखळीचोर सीसीटीव्हीत कैद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - जयभवानीरोडवरील आडकेनगर येथे गुरुवारी सकाळी 9.30 ते 9.45 वाजेच्या दरम्यान काही अंतरावरच दोन महिलांच्या गळ्यातील प्रत्येकी दीड तोळे वजनाच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या. यापैकी एका घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले असून, पोलिसांनी त्यानुसार चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

भूपेंद्र कौर राजेंद्रसिंग (रा. रामकृष्ण संकुल, फ्लॅट नंबर 2) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास हातगाडीवर भाजीपाला खरेदी करीत असताना काळ्या मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दीड तोळे वजनाची सोन्याची सोनसाखळी हिसकावून पलायन केले. दुसरी घटना त्याच रस्त्यावर काही अंतरावर घडली. विद्या बाळासाहेब माळवे (रा. गुलमोहोर कॉलनी, आनंदनगर) हातगाडीवर भाजी खरेदी करीत असताना चोरट्यांनी त्यांच्याही गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. चोरटे 18 ते 20 व 20 ते 25 वयोगटातील होते. घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील रेकॉर्डिंगची तपासणी केली असता, एका घटनेतील आरोपी कॅमेर्‍यात कैद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.