आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नातील सोने पुन्हा आले ‘तोळ्यात’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सहा महिन्यांपूर्वी लग्नातील सोन्याची देवाणघेवाण तोळ्याऐवजी रोख रकमेत आली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम म्हणून घसरलेल्या सोन्याच्या किंमतीमुळे हे गणित पुन्हा तोळ्यात आले आहे. लग्नसराईची धामधूम सुरू असल्याने दागिने घडविण्याच्या कामात वाढ झाली आहे. अत्याधुनिकेच्या युगातही पारंपरिक दागिन्यांच्या मागणीतील सातत्य कायम आहे. अक्षय्य तृतीयेचा सोमवारचा मुहूर्त स्वस्त दरात सोने लुटण्याचा असल्याने सराफी पेढय़ा झळाळणार आहेत.

सोन्याचे भाव गेल्या तीन वर्षांत सातत्याने वाढत राहिले. सहा महिन्यांपूर्वी दहा ग्रॅमसाठी तीस हजारांचा आकडा सोन्याने पार केला. त्याचा परिणाम दागिन्यांचे वजन घटण्यासह लग्नातील देण्याघेण्यावरही दिसून आला. सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना सोने खरेदी परवडेनाशी झाली. लग्नातही तोळ्यांऐवजी रोख रक्कम देण्यावर भर दिला जात होता. मात्र, 12 एप्रिलपासून जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्थितीने सोन्याचे दर 12 मे पर्यंत 27650 रुपयांपर्यंत स्थिरावले. यामुळे ग्राहकांकडून सोने खरेदीचे प्रमाण वाढले असून अक्षय्य तृतीयेची उलाढाल अनपेक्षितपणे वाढणार आहे.