छायाचित्र - फाइल फोटो
येवला - 'येवल्याची अस्सल पैठणी' म्हणत सेमी पैठणी साडी माथी मारून एका विक्रेत्याने डोंबिवलीच्या ग्राहकांची फसवणूक केली. ती लक्षात येताच अखेर विक्रेत्याने त्यांना ७० हजार रुपये परत केले.
डोंबिवली, बदलापूरचे अजित पाटील, दीपक राणे, तन्वी कदम, बागवे व चव्हाण कुटुंबीय मंगळवारी येवल्यात पैठणी खरेदीसाठी आले होते. नामांकित दालनात त्यांनी ७० हजारांच्या पैठणी खरेदी केल्या. त्यावरील कलाकुसरीचे काम कसे होते, या कुतूहलापोटी ते चव्हाण यांचे मित्र प्रशांत कोकणेंकडे गेले. पैठणीवरील जरतारी मोर, कुंडी असे काम बघितले. खरेदी केलेल्या पैठणी दाखवल्या. मात्र, त्या अस्सल नसून सेमी असल्याचे विणकरांनी सांगताच त्यांना धक्का बसला.
विणकरच सरसावले
ही फसवणूक पाहता काही विणकरच सरसावले आणि त्यांनी संबंधित दुकान गाठले. आधी आढेवेढे घेणा-या विक्रेत्याने नंतर मात्र ‘तुम्ही ज्या साड्या पसंत केल्या त्याच आम्ही दिल्या’ अशी सारवासारव केली. ग्राहकांचा पारा चढताच ‘साड्या पसंत नसतील तर परत द्या अन पैसे घेऊ जा’ असे सांगितले. ग्राहकांचे ७० हजार रुपये परत केले. बिल परत घेऊन फाडून टाकत पुरावेही नष्ट केले. मात्र, ग्राहकांनी बिल व दुकानाचे फोटो
मोबाइलमध्ये काढलेले होते.
ग्राहक न्यायालयात जाणार
अस्सल पैठणी मिळेल म्हणून आम्ही येवल्यात खरेदीककरता आलो होतो. मात्र, दुकानदाराने फसवणूक केली. इतर कोणासोबत असा प्रकार होऊ नये म्हणून आम्ही ग्राहक न्यायालयात जाणार आहोत.
- अजित पाटील, ग्राहक, डोंबिवली
अस्सल पैठणी कशी ओळखाल ?
असली
1 हातमागावरच विणली जात असल्याने पैठणीवरील रंग, डिझाइन दोन्ही बाजूने सारखे.
2 चार ते दहा हजारांपर्यंतची असली पैठणी विणायला किमान ४-५ दिवस लागतात.
3 पैठण, येवल्यातील विणकर हातमागावर विणतात.
नकली
1 जकार्टवर विणल्याने मागील बाजूने धागे निघालेले दिसतात, डिझाइनही पुसट असते.
2 नकली पैठणी याच्या निम्म्या दिवसात तयार होते, तिची किंमतही निम्मी असते.
3 बंगळुरू, बनारस, कोईम्बतूर यांसारख्या शहरात तयार होते.