आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Price Come Down, Purchasing Proporation Increased

सोन्याची घसरण, खरेदीला उधाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या आठवडाभरात सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर ग्राहक खरेदीची संधी साधत असल्याने सरासरी 50 टक्क्यांनी विक्री वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रतितोळा 33 हजारांच्या आसपास पोहोचलेला सोन्याचा भाव 28 हजारांपर्यंत खाली आल्याने सर्वसामान्यांनाही सोने खरेदी आवाक्यात आल्याचे वाटत आहे. विशेष म्हणजे, विवाह समारंभासाठी दागिने खरेदी करणा-यांना या स्थितीचा लाभ होत आहे.


सोन्याचे भाव सन 2008 पासून सातत्याने वाढत जाऊन 2013 च्या जानेवारीपर्यंत तब्बल 32, 800 रुपयांवर जाऊन पोहोचले होते. हा सोन्याचा उच्चांक होता. यामुळे ग्राहकांसाठी सोने खरेदी दिवास्वप्नच ठरू लागली होती. मात्र, गेल्या आठवड्यात भाव सुमारे दीड हजारांनी घसरल्याने सोने खरेदीची ही संधी ग्राहकांकडून कॅश केली जात असल्याचे चित्र शहरातील सर्वच सराफी पेढ्यांत अनुभवायला मिळत आहे.


खरेदीचा मोठा उत्साह
गुढीपाडव्याच्या खरेदीपेक्षाही जास्त खरेदी शनिवारी झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. शनिवारी दहा ग्रॅममागे 1200 रुपयांनी भाव तुटल्याने खरेदी 50 टक्क्यांनी वाढली. केवळ लग्नसराईसाठीच नव्हे, तर गुंतवणूकदार वर्ग चोख सोनेही खरेदी करत आहे. सोने खरेदीची ही उत्तम संधी असल्याचे ग्राहकांना जाणवू लागल्याचे नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी सांगितले.300 टक्क्यांपर्यंत वाढ
ऐन लग्नसराईच्या तोंडावर भाव उतरल्याने ग्राहकांचा फायदा होतो आहे. दागिने, चोख सोने यांना मोठी मागणी असून, या आठवड्यात किमान तीनपट खरेदी वाढली आहे. सोने खरेदी करायची हीच खरी वेळ असल्याचे ग्राहकांनी समजून घेणे गरजेचे आहे.
धनंजय दंडे, गोविंद दंडे अ‍ॅण्ड सन्स


50 टक्के वाढली खरेदी
गुढीपाडव्याच्या दुस-या दिवशीच भाव 1200 रुपयांनी उतरल्याने गर्दीचा उच्चंक पाहायला मिळतो आहे. दैनंदिन व्यवहारापेक्षा किमान 50 टक्के खरेदी वाढली आहे. 27 तारखेपासून सुरू होणा-या लग्नसराईच्या अनुषंगाने दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते आहे.
नीलेश बाफणा, संचालक, बाफणा ज्वेलर्स प्रा. लि.


भाव उतरल्याचा फायदा
माझ्या घरी लग्न असल्याने मी आज खरेदी करतो आहे. चार दिवसांपूर्वीपेक्षा 1300-1400 रुपये प्रतितोळा कमी लागत असल्याने फायदाच झाला असून, भाव उतरल्याचा निश्चित आनंद आहे.
रामदास मासाळे, ग्राहक


सोने आले आवाक्यात
गगनाला भिडणारे सोन्याचे भाव वेगाने कमी झाल्याने सोने घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याचा आनंद वाटतो आहे. भाव कमी झाल्यानेच आम्ही सोने खरेदीला आलो आहोत.
जयश्री शिंदे, ग्राहक