आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा रहाडी बंद, ‘दिव्य मराठी टिळा होळी’ला प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरावर अाेढवलेले ‘न भूताे’ पाणीटंचाईचे संकट दाह पाहून ‘दिव्य मराठी’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, नाशिकची परंपरा असणाऱ्या ‘रहाडी’ यंदा बंद ठेवण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याची नासधूस टाळण्यासाठी तिवंधा (मधली होळी) आणि शनी चौकातील मित्रमंडळांनी यंदा टिळा होळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे.

रंगपंचमीच्या दिवशी नाशिकची पूर्वापार परंपरा असलेली रहाड दरवर्षी उघडली जाते. त्यासाठी हजारो लिटर पाणी वापरले जाते. शिवाय, रहाडीतील पाण्याचा रंग पक्का असतो. तो काढण्यासाठी पुन्हा पाणी वापरले जाते. त्यामुळे रहाडी यंदा बंद ठेवून पाण्याची बचत करण्याचे आवाहन ‘दिव्य मराठी’ने केले होते. रहाड नियोजकांनी तत्काळ या आवाहनाचे स्वागत करत रहाड यंदा बंद ठेवून कोरडी, टिळा होळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे.
एका रहाडीत साधारणपणे ३० ते ४० हजार लिटर पाणी एकावेळी वापरले जाते. ती धुण्यासाठीही तितक्याच पाण्याचा वापर होतो. त्यामुळे जवळपास ८० हजार लिटर पाणी यातून वाचणार अाहे. भीषण पाणीटंचाई असताना परंपरांना फाटा देण्यात काहीही गैर नाही, लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसताना आपल्याकडे शिल्लक असलेल्या पाण्याची नासाडी करण्यात अर्थ नाही, असा विचार या युवकांनी केला आहे.

मित्रमंडळांच्या सदस्यांसह आसपासच्या युवकांनाही रंगपंचमीसाठी टिळा होळी साजरी करून पाण्याचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. जुन्या नाशकात फार मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी केली जाते. युवकांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे ‘दिव्य मराठी’च्या आवाहनाला अन्यत्रही चांगला प्रतिसाद मिळणार आहे. युवकांनी केलेल्या या संकल्पामुळे शहरातील पारंपरिक रहाडी बंद ठेवण्यात येणार अाहेत.
टिळा होळी... पाणी बचतीचा संकल्प
दुष्काळी स्थितीमुळे नाशिककरांना सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा साेसाव्या लागत अाहेत. या पार्श्वभूमीवर यंदाची हाेळी रंगपंचमी साजरी करताना पाणीटंचाईचे भान ठेवणे गरजेचे अाहे. म्हणून होळी रंगपंचमी पाण्याविना साजरी करण्याचे आवाहन ‘दिव्य मराठी’तर्फे करण्यात येत अाहे. त्यासाठी सुजाण नागरिक म्हणून आपण हे करू शकता : रंगाेत्सवातील नाशिकची परंपरा असलेल्या रहाडी यंदा बंद ठेवता येईल, रंगीत पाण्याचे स्प्रिंकलर्स बंद ठेवता येतील, रंगाेत्सवात पाण्याचा वापर करता काेरड्या रंगाचा वापर करावा, कारण पाण्याचा वापर करून खेळलेला रंग काढण्यासाठीही भरपूर पाणी वापरावे लागते. त्यामुळे पाण्याची जी उधळपट्टी होते ती थांबेल. त्यासाठी प्रत्येकाने केवळ ‘टिळा हाेळी’च साजरी करण्याचा संकल्प करावा, असे अावाहन ‘दिव्य मराठी’तर्फे करण्यात येत अाहे. सामाजिक संस्था, तरुणांचे गट विविध संस्थांनी याबाबतचा अापला संकल्प ‘दिव्य मराठी’कडे ८७९६४४९७७९९८२२११४४३८ याक्रमांकांवर व्हॉट्सअॅपद्वारे कळवावा. त्यास याेग्य प्रसिद्धी दिली जाईल.
बातम्या आणखी आहेत...