आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Good News For Nashikite: Underground Way, Padistrican

नाशिकरांसाठी चांगली बातमीः मार्ग भुयारी, सुखावणार पादचारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर उत्तम उपाय ठरणार्‍या भुयारी मार्गाचे काम झपाट्याने पूर्णत्वास जात असून, आठवडाभरात तो शहरातील पादचार्‍यांसाठी खुला होणार आहे. रंगरंगोटी व अन्य छोटी-मोठी कामे संबंधित यंत्रणा युद्ध पातळीवर पूर्ण करीत आहे.

शहरांतर्गत वाहतूक आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असलेल्या द्वारका परिसरात वाहनांची गर्दी रोजचीच. त्यातून होणारी वाहतूक कोंडी व त्यामुळे वाहनधारकांसह पादचार्‍यांना होणारा त्रास यावर भुयारी मार्गाच्या रूपाने तोडगा काढण्यात आला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत साकारलेल्या उड्डाणपुलामुळे मुंबईकडे, तसेच मालेगाव-धुळ्याकडे जाणार्‍या वाहनांची मोठीच सोय झाली आहे; परंतु द्वारका येथे सटाणा, मालेगाव, धुळे, पुण्याकडे जाण्यासाठी थांबे आहेत. तेथे एसटी बससह खासगी वाहनांची नेहमीच गर्दी असते. पादचारीही किरकोळ कामासाठी या परिसरातून वावरतात. त्यांना वाहतूक कोंडीचा नित्य सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेहा भुयारी मार्ग उभारला आहे. हा मार्ग खुला झाल्यावर पादचारी त्याचा उपयोग करतील. दोन-तीन दिवसांत तो पादचार्‍यांसाठी सज्ज होणार असल्याची माहिती संबंधित कर्मचार्‍यांनी दिली.


असा असेल भुयारी मार्ग
मार्ग 1 : द्वारका पोलिस चौकीसमोरील प्रवेशद्वार - येथून हॉटेल द्वारका, हनुमान मंदिर, हॉटेल सनफ्लॉवर, शहीद भगतसिंग चौक, जुने नाशिककडे जाता येईल.
मार्ग 2 : शहीद भगतसिंग चौक प्रवेशद्वार - हॉटेल द्वारका, हनुमान मंदिर, द्वारका पोलिस चौकीकडे.
मार्ग 3 : हॉटेल सनफ्लॉवर प्रवेशद्वार - हॉटेल द्वारका, हनुमान मंदिर, द्वारका पोलिस चौकीकडे.
मार्ग 4 : हॉटेल द्वारका प्रवेशद्वार - शहीद भगतसिंग चौक, जुने नाशिक, हनुमान मंदिर, हॉटेल सनफ्लॉवर, द्वारका पोलिस चौकीकडे जाण्यासाठी उपयुक्त.
मार्ग 5 : हनुमान मंदिर प्रवेशद्वार - शहीद भगतसिंग चौक, जुने नाशिक, हॉटेल द्वारका, हॉटेल सनफ्लॉवर, द्वारका पोलिस चौकीकडे.


.. तरच होईल उद्देश सफल
पादचार्‍यांच्या सोयीसाठी हा मार्ग तयार केला असला तरी त्याचा योग्य वापर केला तरच उद्देश सफल होणार असल्याचे सुजाण नागरिकांचे मत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ उभारलेला भुयारी मार्ग वापरण्यापेक्षा लोक रस्ता ओलांडणेच पसंत करतात. भुयारी मार्गाचा वापर करण्यास भाग पाडून पायी रस्ता ओलांडणार्‍यांना रोखण्याचे कामही करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.