आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम - 91 हजार 236 हेक्टर क्षेत्रावर पेरणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळवण - उपविभागात पावसाने जुलैच्या पंधरवड्यात दमदार आगमन करत शेतकरीवर्गाची चिंता दूर केली आहे. या उपविभागात खरिपाची 70 टक्के पेरणी झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कळवण व सुरगाणा तालुक्यांत भात लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. येत्या आठ दिवसांत 90 ते 91 टक्के पेरणी पूर्ण होण्याचा अंदाज उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांनी व्यक्त केला आहे.

भरपूर पाऊस पडणा-या उपविभागात गेल्या चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण चिंताजनक होते. यावर्षी पावसाने एक महिना उशिराने मात्र दमदार हजेरी लावत उपविभागात साधारण 1140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. कृषी विभागाच्या बांधावर खत योजनेंतर्गत उपविभागातील शेतक-यांनी साधारण 10 हजार टन खत घेतल्याची नोंद आहे. उपविभागात पडणारा मुबलक पाऊस व थंड हवामान मका, बाजरी, भात, नागली व ज्वारी या पिकांसाठी पोषक असल्यामुळे या पिकांची येथे मोठ्या प्रमाणात लागवड होते. तर सोबत तूर, मूग, उडीद आदी तृणधान्य व भुईमूग, तीळ, खुरासणी, सोयाबीन, सूर्यफूल आदी अन्नधान्याची ब-यापैकी लागवड होते. शिवाय, उसाचे क्षेत्रही येथे ब-यापैकी असते. या उपविभागात मका, बाजरी, भात व नागली ही पिके मुख्यत्वे घेतली जातात. या उपविभागात कळवण, देवळा व दिंडोरी तालुक्यात मका पेरणी 80 टक्के झाली आहे . त्याखालोखाल बाजरीची ७८ टक्के पेरणी झाली आहे. त्यासोबतच इतर अन्नधान्य व तृणधान्याची सुमारे 52 टक्के पेरणी झाली आहे. खरीप पिकांचा विचार करता कळवण उपविभागात 70 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कळवण व देवळा ही दोन्ही तालुके अनुक्रमे ७८ व ७९ टक्के पेरणी करून आघाडीवर आहेत. तर, त्याखालोखाल दिंडोरी तालुक्यात ६७ टक्के व सुरगाणा तालुक्यात 52 टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये कळवण, सुरगाणा व दिंडोरी तालुक्यात घेतल्या जाणा-या भात व नागली पिकांच्या लागवडीला गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जोरात सुरुवात झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सुरगाण्यात सर्वाधिक पाऊस
कळवण उपविभागातील चारही तालुक्यांत यावर्षी 1140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त 390 मिलिमीटर पाऊस सुरगाणा तालुक्यात पडला आहे. तर, त्याखालोखाल कळवण तालुक्यात 330 मि.मी., देवळा तालुक्यात 160 मि.मी., तर दिंडोरी तालुक्यात 250 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देवळा तालुका वगळता तिन्ही तालुक्यांत पावसाचे हे प्रमाण 57 टक्के आहे. गेल्या वर्षी 1 ऑगस्ट 2013 रोजी उपविभागात 757 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वात जास्त 251 मि.मी. पाऊस सुरगाणा तालुक्यात पडला आहे, तर त्याखालोखाल दिंडोरी तालुक्यात आतापर्यंत 188 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर, कळवण व देवळा तालुक्यात अनुक्रमे 176, 143 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

देवनदी प्रवाहित, शेतकरी आनंदित
सिन्नरच्या पूर्व भागाची वरदायिनी म्हणून ओळखली जाणारी देवनदी गेल्या चार दिवसांपासून वाहू लागली आहे. नदीवर कोनांबे येथे धरण असून, गुरुवारी ते भरून वाहू लागल्याने देवनदी प्रवाहित झाली. नदीचे पाणी वाहत पुढे सरकू लागले तसे हरसूल, वडगाव-सिन्नर, डुबेरे रस्त्यावरील बेलांबा, मनेगाव फाटा या परिसरातील शेतक-यांनी आनंद व्यक्त केला. या पाण्यामुळे परिसरातील विहिरींना पाणी येणार असल्याने शेतक-यांना शेतीच्या कामास त्याचा लाभ होणार आहे. नदीवर ब्रिटिशकालीन 32 बंधारे असून, पडणारा पाऊस व नदीचा प्रवाह कायम राहिल्यास पाणी कुंदेवाडी, मुसळगावला समृद्ध करून पूर्व भागाकडे जाणार आहे. सांगवी गावाजवळ देवनदीचा गोदावरीशी संगम होतो. तेथपर्यंत पाणी पोहोचल्यास पूर्व भागातील शेतीच्या आठमाही सिंचनाचा प्र्रश्न मार्गी लागू शकेल, अशी आशा व्यक्त केली जाते.