आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Good Sale In Market On The Occasion Of Vijayadashmi In Nashik

नाशकात 700 फ्लॅट, 800 कारची विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बाजारातील चर्चा खोट्या ठरवत नाशिककरांनी रविवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर खर्‍या अर्थाने मंदीचे सीमोल्लंघन करीत अस्सल सोने लुटले. सराफ बाजारासह शहरातील प्रमुख सराफी पेढय़ा ग्राहकांनी गजबजल्या होत्या. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दालनेही तरुणाईच्या उत्साहाने बहरलेली दिसली. दिवसभरात किमान दोन हजार मोटारसायकली आणि आठशे कारची डिलिव्हरी शहरातील वितरकांनी दिली. स्थावर मालमत्ता व्यवसायातही दिवसभरात करोडोंची उलाढाल झाली. फ्लॅट, प्लॉट नोंदणी ते गृहप्रवेश करताना नागरिकांत उत्साह होता.

सोने-चांदी, दुचाकी-चारचाकी वाहने, फर्निचर आणि वास्तू खरेदीत मोठय़ा प्रमाणावर उलाढाल दरवर्षीच होत असल्याने सराफी पेढय़ा, वाहन विक्री दालने, होम अप्लायन्सेसची दालने ग्राहकांनी दिवसभर गजबजलेली होती. रविवारच्या एकाच दिवसात शहरातील वाहन विक्री उद्योग, सराफी पेढय़ा, प्रॉपर्टी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर विक्रीतून किमान शंभर कोटी रुपयांवर उलाढाल झाल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

प्रॉपर्टीत 100 कोटींची उलाढाल
नवरात्रात प्लॉट, फ्लॅटची बुकिंग ज्या पद्धतीने झाली आहे, त्याचा विचार करता प्रॉपर्टीत किमान 60 कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित होती, तो विश्वास नाशिककरांनी सार्थ ठरविला. दिवसभरात किमान 700 फ्लॅटचे बुकिंग शहरात झाल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गृहखरेदीसाठी बँकांनी दिलेल्या आकर्षक कर्ज योजनांचा फायदा घेताना नाशिककर दिसून आले. गृहबांधणी क्षेत्रात पहिल्या पाचच दिवसांत 20 कोटी रुपयांच्यावर म्हणजे एकूण 100 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. दसर्‍याच्या मुहूर्तावर नव्या वास्तूची खरेदी, गृहप्रवेश, पायाभरणी यांसारख्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याची पार्श्वभूमी यामागे होती. दसर्‍याचा मुहूर्त साधन ज्यांनी याआधी फ्लॅट बुक केले त्यांनी गृहप्रवेश केला.

वाहन उद्योगातही तेजी : विजयादशमीचा मुहूर्त साधण्यासाठी जवळपास सर्वच दुचाकी आणि चारचाकी वाहन कंपन्यांच्या शहरातील विक्री दालनांत रविवारी ग्राहकांनी आपल्या मनपसंत कार, मोटारबाइक्सची डिलिव्हरी घेतली. दिवसभरात किमान दोन हजार दुचाकी आणि आठशेवर कार व अवजड वाहनांची डिलिव्हरी देण्यात आली. यातून शहरात 30 कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.


सोन्याची झळाळी आणि आकर्षण कायम
रिझर्व्ह बँकेने सोने खरेदी कमी व्हावी, याकरिता विविध निर्बंध लादले असले तरी लोकांमधील सोने खरेदीचे आकर्षण तिळमात्रही कमी झालेले नसल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. कमी झालेल्या भावाचा फायदा घेत नाशिककरांनी मनपसंत अस्सल सोने लुटले. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे भाव काही अंशी कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सराफी पेढय़ा गजबजलेल्या होत्या. मुहूर्तावरील खरेदी म्हणून ग्राहकांनी वेढे, नाणे आणि दागिने खरेदी केले. शहरात चोख सोन्याचा भाव 30,400, तर 22 कॅरेटचा भाव 29,100 रुपयांच्या आसपास (प्रतिदहा ग्रॅम) राहिला.


दागिन्यांना उत्तम मागणी
तीन वाजेनंतरचा मुहूर्त असला तरी मुहूर्तावरील खरेदी म्हणून ग्राहकांकडून दागिन्यांना दिवसभर चांगली मागणी राहिली. आशेष बागुल, संचालक, तनिष्क


ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
चारचाकी वाहन खरेदीला शहरातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दिवसभरात आम्ही 115 कारची डिलिव्हरी दिली. अनेकांनी कारची बुकिंगही केले. अल्टो, वॅगन आर, स्विफ्ट या कारला चांगली मागणी राहिली. नाशिक शहराचा विचार करता आठशेच्या आसपास कारची डिलिव्हरी झाली असावी. राजेश कमोद, महाव्यवस्थापक, सेवा ऑटोमोटिव्ह

दुचाकींना चांगली मागणी
आम्ही दिवसभरात 150 बाइक्सची डिलिव्हरी दिली. कोजागरी आणि दिवाळीकरिताही चांगले बुकिंग झाले. तरुण ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरात सर्व कंपन्यांच्या मिळून किमान दोन हजार मोटारसायकलींची डिलिव्हरी मुहूर्तावर झाली. विजय कुलकर्णी, विक्री व्यवस्थापक, मॅजिक टीव्हीएस

चोख सोन्यालाही मागणी
दागिन्यांना तर मागणी होतीच; शिवाय नाणी आणि अनकट डायमंडस्लाही चांगली मागणी राहिली. दिवसभर ग्राहकांत खरेदीचा उत्साह दिसून येत होता. सम्यक सुराणा, संचालक, सुराणा ज्वेलर्स


घर खरेदीत उत्साह
घर खरेदीची हीच योग्य वेळ असल्याने शहरात किमान 700 फ्लॅटच्या नोंदणीचा अंदाज आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्यांना घर घ्यायचे आहे तोच वर्ग खरेदीसाठी येत आहे, गुंतवणूकदार दिसत नाहीत. याचा फायदा ग्राहकांनाच होत असून, दिवाळीपर्यंत हीच स्थिती कायम असेल. अभय तातेड, उपाध्यक्ष, क्रेडाई, नाशिक