आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तिमत्त्वाचे आयाम सांगते स्वाक्षरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्तीचे हस्ताक्षर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वांगीण माहिती देत असते. त्या व्यक्तीचे आचरण, मानसिकता कशी आहे, हे स्वाक्षरीचे गूढ जाणणारा तज्ज्ञ अगदी सहज सांगू शकतो. व्यक्ती सध्या करीत असलेल्या स्वाक्षरीत त्याने काहीअंशी सुधारणा केली, तर त्याचे जीवन सर्वार्थाने बदलू शकते अशी अनेक उदाहरणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्वाक्षरी तज्ज्ञ माणकलाल अग्रवाल यांनी दिली.

स्वाक्षरी कशी असावी, ती कशी असू नये आणि सध्याची स्वाक्षरी काय सांगते? याची अनेक उदाहरणे त्यांनी मांडली. त्यांनी ज्या-ज्या स्वाक्षरीबाबत मते मांडली ती तंतोतंत खरी आहेत. अग्रवाल यांनी 20 वर्षांच्या संशोधनातून स्वाक्षरीबद्दल प्रगाढ ज्ञान मिळविले असून ‘सक्सेस आर फेलर, फ्रेंड्स आर इनमीज, सिग्नेचर अनफोल्ड रियालिटी’ नावाचे त्यांचे पुस्तक अधिक मार्गदर्शन करत असून, जगभरातील अनेक कंपन्या त्यांच्याकडून लोगो डिझाइनही करून घेतात, अग्रवाल यांच्याशी साधलेला संवाद त्यांच्याच शब्दात..

जीवनात स्वाक्षरीचे महत्त्व..
स्वाक्षरी त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, त्याच्या कामाची पद्धत आणि त्या बदल्यात त्याला काय फळ मिळते याची माहिती देते. व्यक्ती ज्या पद्धतीने स्वाक्षरीतील पहिले ते शेवटचे अक्षर लिहितो, त्यातील शब्दांचा आकार, प्रत्येक शब्दातील अंतर किती आहे हे, स्वाक्षरी करताना व्यक्ती किती वेळा पेन उचलते यातून बरेच काही सांगता येते. योग्य स्वाक्षरी, त्यातील शब्दांची योग्य मांडणी यातून जीवन बदलता येणे शक्य असल्याने जीवनात स्वाक्षरीचे खूप महत्त्व आहे.

असे अक्षर, अशी व्यक्ती
समजा, एखादी व्यक्ती आपल्या स्वाक्षरीतील शेवटचे अक्षर असे लिहिते की हे अक्षर काय आहे ते समजत नाही तर ती व्यक्ती आपले काम योग्य प्रकारे करीत नाही आणि त्याचे फळही त्याला योग्यप्रकारे मिळत नाही असे समजावे. पहिल्या आणि दुसर्‍या शब्दात योग्य अंतर नसलेली व्यक्ती भावुक होत असते. ज्याच्या स्वाक्षरीतील पहिले अक्षर आकर्षक असेल ती व्यक्ती अतिशय प्रेमळ स्वभावाची असते.

पहिलेअक्षर मोठे
स्वाक्षरीत पहिले अक्षर सर्वात मोठय़ा आकाराचे असेल तर अशी व्यक्ती मोठे स्वप्न पाहणारी असते. समाजात त्याला उच्च् स्थान असते, त्याला मानसन्मान मिळतो. जर कोणाच्या स्वाक्षरीतील शेवटचे अक्षर खालील बाजूस जात असेल तर ती व्यक्ती रागीट स्वभावाची असते. इंग्रजी ‘आय’ किंवा ‘जे’ या अक्षरांवर योग्य ठिकाणी टिंब न देणारी व्यक्ती बेफिकीर असते.

जीवन बदलू शकतो
लांबलचक स्वाक्षरी करणार्‍याचे वेतन अधिक असते. तो आपला रस्ता निश्चित करू शकतो. असफलता यशात बदलू शकते, तर व्यक्तीच्या आत्मविश्वासात प्रचंड बदल घडू शकतो. स्वभावही बदलू शकतो. केवळ तीन-चार आठवड्यांत याबाबतचा बदल तुम्ही स्वत:च अनुभवू शकता. ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात काही महिन्यांतच अविश्वसनीय बदल होतो.

हे करा, हे टाळा
स्वाक्षरी करताना सर्व शब्द एकाच रेषेत असावेत. शेवटचे अक्षर मोठे, सुस्पष्ट असावे. आपले आकर्षक व्यक्तिमत्त्व त्यातून अधोरेखित होते. कोणतेही अक्षर दुसर्‍या अक्षरात गेलेले नसावे, स्वाक्षरीखालील रेष शेवटी परत मागे येणार नाही याची काळजी घ्या. कोणतेही अक्षर स्ट्रोक देऊन तोडू नका. स्वाक्षरीच्या शेवटी किंवा मध्येच डॉट देऊ नका. यामुळे तुमची प्रगती थांबते.