आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी योजना: गुगल मॅपिंग रोखणार शाळांतील भ्रष्टाचार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कमी अंतरावर शाळा असल्याने एका विद्यार्थ्याचे दोन शाळांत नाव असल्याने शासनाची लूट सुरूअसल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले. राज्यात पाचवी आणि आठवीचे अठराशे नवीन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. कमी अंतरावरच वर्गांना मान्यता मिळाली, तर भ्रष्टाचार होण्याची अधिक शक्यता असते म्हणून शासन आता लेखी नोंदीऐवजी गुगल मॅपिंगवरून शाळेच्या अंतराची माहिती घेणार आहे. त्यामुळे बोगस पटसंख्येला आळा बसून भ्रष्टाचाराला लगाम बसणार आहे.

राज्यात पाचवीचे 1 हजार 588, तर आठवीचे 260 ठिकाणी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. पूर्वी शाळांत जास्त अंतर दाखवून एकाच विद्यार्थ्याच्या नावावर शासनाच्या विविध योजनांचा पैसा लाटला जात होता. प्रत्यक्ष मुलांची संख्या कमी असूनही कागदावर पटसंख्या ही मोठय़ा प्रमाणात होती. नुकतेच पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याने शाळांमधील अंतर हे काटेकोरपणे नोंदवण्यासाठी लेखी नोंदीसह गुगल मॅपिंगद्वारेही शाळांचे अंतर तपासण्यात येणार आहे. दोन दिवसांपासून प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी शाळांमध्ये जाऊन आपल्या अँड्रॉइड मोबाइलमध्ये शाळेचे नाव, ठिकाण, यू डायस कोड नंबर यांची माहिती सर्च करून नोंदणी करत आहेत.
पाचवीचा वर्ग असलेली शाळा ही 1 किलोमीटरच्या आत, तर आठवीचा वर्ग असलेली शाळा ही 3 किलोमीटरच्या आत नसावी यासाठी या गुगल मॅपिंगचा उपयोग होणार आहे. या योजनेसाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील शाळांची नोंद
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शाळांची गुगल मॅपिंगवर नोंद करण्यात येत असून त्यासाठी गटशिक्षणाधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या नोंदीमुळे शाळांच्या प्रत्यक्ष अंतराची माहिती मिळणार आहे, त्यामुळे पटसंख्येवर नियंत्रण राहणार आहे.
- रहिम मोगल, शिक्षणाधिकारी प्राथमिक

शासनाला लाभ
दोन दिवसांत नाशिक तालुक्यातील 182 पैकी 176 शाळांची गुगल मॅपिंगवर नोंदणी करण्यात आली आहे. ही एकदम चांगली योजना असून राज्य सरकारला या योजनेचा लाभ होणार आहे. यापुढे आता शाळा शोधण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
- अनिल शहारे, गटशिक्षणाधिकारी