नाशिक- दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया विधी गुरुवारी श्रीक्षेत्र पैठण येथे करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या येवला तालुक्यातील काही ग्रामस्थांनी गावातच हा विधी केला. नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक हजार ग्रामस्थांनी मुंडण करून आपल्या नेत्याला आदरांजली वाहिली. यात राजापूर गावातील 800 ग्रामस्थांचा समावेश आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीने मुंडण करून संपूर्ण गावाने दहा दिवस दुखवटा पाळला होता. ठाणे येथील एकनाथ महाराज सदगीर यांचे कीर्तनही झाले. नगरसूल येथेही 101 नागरिकांनी मुंडण केले. त्याचबरोबर शिवाजी महाराज भालेराव यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
नाशकात चालक-वाहकांचाही दुखवटा : नाशिकमध्ये शहर बस वाहतुकीच्या पंचवटी आगारातील चालक-वाहकांनीही सार्वजनिक मुंडण करून मुंडेंना श्रद्धांजली अर्पण केली. हा दशक्रिया विधी गोदावरी तीरी पार पडला. निधनासमयी मुंडेचे वय 64 वर्षे होते, त्यामुळे आगारातील 64 चालक -वाहकांनी हा विधी केला. विधी झाल्यानंतर हे चालक -वाहक पंकजा मुंडे यांच्या सांत्वन भेटीसाठी परळीला रवाना झाले.