आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Govdavari More Important Rather Than Kumbhamela, Dr. Rajendra Singh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदावरी वाचवण्यासाठी कुंभमेळाच रद्द करा -पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘गोदावरीत सोडण्यात येणारे सांडपाणी तातडीने बंद करावे आणि ते शक्य नसल्यास नाशकात कुंभमेळाच भरवू नका,’ असे उद्गार आंतरराष्‍ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी शनिवारी काढले. गोदावरीची झालेली गटारगंगा बघून ते कमालीचे व्यथित झाले होते. केवळ मलजलच नाही तर प्रक्रिया केलेले सांडपाणीदेखील नदीपात्रात सोडण्यास मज्जाव करावा, अशी सूचना त्यांनी केली.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वसुंधरा फेस्टिव्हलच्या निमित्ताने शनिवारी डॉ. राजेंद्रसिंह यांनी रामकुंडाची व मलनिस्सारण प्रकल्पाचीही पाहणी केली. गोदावरीचे विदारक रूप पाहिल्यानंतर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीमुळेच गोदावरी नदीच्या स्वच्छतेवर खर्च झालेले 350 कोटी रुपये कशा प्रकारे पाण्यात गेले हे त्यांनी उघड केले.


..तर नाशिककरांना दोषी ठरवले जाईल
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी गटारमुक्त न केल्यास कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणा-या साधू-महंतांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही, अशी भीतीही राजेंद्रसिंह यांनी या वेळी व्यक्त केली. सध्या गोदावरी नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून, ते भाविकांना स्नान करण्यास योग्य राहिलेले नाही. या दूषित पाण्यात कुंभमेळा भरवला तर वेगवेगळे आजार उद्भवतील. त्याला जबाबदार नाशिककरांनाच धरले जाईल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.


नदीविषयक धोरणच नाही
स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक कृषिमंत्री महाराष्ट्रातून झाले आहेत. राज्यात 40 टक्के धरणे असूनही दुष्काळामुळे आत्महत्या करणा-यांची संख्या या राज्यात वाढतीच आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. वर्षाचक्र आणि पीक नियोजनाचा अभाव यामुळे नद्या कोरड्या पडत आहेत. ठेकेदारांच्या या राज्यात नद्या आणि पाण्याचे बाजारीकरण होत असल्यानेच नद्या प्रदूषित होत असल्याचे राजेंद्रसिंह यांनी सांगितले.


‘नदी पंचायत’ची गरज
गोदा प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी संघटित होण्याची गरज आहे. कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी गोदावरी गटारमुक्त झालीच पाहिजे. त्यासाठी ‘नदी पंचायत’ आयोजित करून व्यवस्थेवर दबाव निर्माण केला पाहिजे. गोदावरी प्रदूषणावर संशोधन व्हायला हवे. नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी झालेल्या आंदोलनांची उदाहरणे देत गोदावरी संरक्षणासाठी मोठे आंदोलन उभारण्याचे आवाहन सिंह यांनी केले.


‘ग्रीन कुंभ’साठी संघटित व्हा, पूरक सुविधा निर्माण करा
नाशिकमध्ये होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा ‘ग्रीन कुंभ’ म्हणून साजरा व्हावा, यासाठी पर्यावरणवादी संघटना व पर्यावरणप्रेमींनी संघटित होण्याची गरज असल्याचे मत राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. सन 2015 मध्ये गोदाकाठी होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो साधू-महंत व भाविक येणार असून, त्यांना पूरक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे.


राजेंद्रसिंह म्हणाले...
ग्रीनकुंभ उभारण्याची गरज
* गोदेचे पाणी प्रचंड दूषित आहे. जिथे पैसा आहे, तेथे अधिकारी आणि ठेकेदार एकत्र येऊन काम करतात. मलनिस्सारण प्रकल्पामुळे प्रदूषण कमी होत नाही. नदीकडे जीवन म्हणून पाहिले पाहिजे.
* गोदावरीचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी अतिक्रमण, प्रदूषण आणि काँक्रिटीकरण थांबवून नदीला प्रवाहित ठेवण्याची गरज आहे. कोट्यवधी रुपयांच्या निधीचा उपयोग नाशिकच्या सौंदर्यीकरणावर, ‘पार्क’वर खर्च न करता ‘ग्रीन कुंभ’ होण्यासाठी त्याचा विनियोग व्हायला हवा.
* गोदावरी गटारमुक्त करण्यासाठी नदीला मिळणारे नाले, गटारी यांचे सर्वेक्षण करून ते कायमस्वरूपी बंद करावे लागतील. यासाठी लोकांनी संघटित होऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे.