आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govdavari River News In Marathi, Environment, Divya Marathi, Nashik

गोदावरीच्या पाण्यातील ऑक्सिजनची पातळी आणणार दहापर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - गोदावरी नदीपात्रातील जलचरांना जीवदान मिळावे, यासाठी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) प्रकल्प गंगापूरजवळ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीमधील पाण्यातील ऑक्सिजनची पातळी दहा मिलिग्रॅमपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली.


गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्तसमितीची बैठक गुरुवारी (दि. 17) विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस निरा, एमआयडीसी, जलसंपदा व महापालिकेचे प्रतिनिधी तसेच याचिकाकर्ते राजेश पंडित, निशिकांत पगारे, सुनील मेंढेकर व नितीन रुईकर उपस्थित होते.


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात उच्चस्तरीय समितीने बुधवारी बालाजी मंदिरापासून दसक पुलापर्यंत गोदाकाठाची पाहणी केली होती. त्यावर संबंधित यंत्रणांनी कोणती कारवाई केली, महालिकेच्या त्रुटी यावर बैठकीत चर्चा झाली. नदीतील जलचरांना जीवदान मिळावे, यासाठी नदीपात्रातील पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी पाच मिलिग्रॅमपर्यंत असणे आवश्यक असते. गोदावरीत ही पातळी 30 मिलिग्रॅमपर्यंत पोहोचली असून, प्रदूषित पाणी रोखून ती दहापर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी गंगापूरजवळ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच, ब्रम्हगिरीपासून नांदूरमध्यमेश्वरपर्यंत नदीचे खोरे विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प ठरू शकतो, असे आयुक्त डवले यांनी सांगितले.


गोदावरी नदीपात्रात वाहने धुण्याचे प्रमाण वाढले असून, त्याला प्रतिबंध करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याबाबात पोलिस विभागाशी चर्चा झाली असून, त्यांच्याकडून कृती आराखडा पालिकेला सादर केला जाणार आहे. गोदावरी ज्या ठिकाणी प्रदूषित होते, त्या उगमस्थानांची पाहणी करण्यात आली आहे. दसक ते एकलहरेपर्यंत नदीत अनेक ठिकाणी दूषित पाणी सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. ते पाणी अडवून सिन्नरच्या इंडिया बुल्स कंपनीला वीजनिर्मितीसाठी वळवण्यात येणार आहे. रामकुंड व नदीपात्रात नागरिकांकडून निर्माल्य टाकले जाते, त्याबाबत अस्थिकलशात अस्थी टाकण्याबाबत प्रबोधन केले जाणार आहे.


जलचरांना जीवदान मिळणार
गोदावरी नदीपात्रातील पाण्यात ऑक्सिजनची पातळी 30 मिलिग्रॅमपर्यंत पोहोचलेली आहे. ही पातळी पाच मिलिग्रॅमपर्यंत आवश्यक असते. जलचरांना यामुळे जीवदान मिळणार आहे. मध्यंतरी गोदापात्रात हजारो मासे मृत झाल्याचे आढळले होते. जलचरांना या पाण्यातून प्राणवायू वेगळा करून घेता येत नसल्याने तसेच पाण्याच्या प्रदूषणामुळे जीव गमवावा लागला होता. पाण्यातील प्राणवायूची पातळी प्रमाणशीर असल्यास जलचरांना जीवदान मिळणार आहे.