आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी पेढीत रक्ताचा ‘दुष्काळ’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ब्लड ऑन कॉल’ नामक योजना वाजतगाजत सुरू केली असतानाच, ‘ऑन कॉल’ सोडाच; प्रत्यक्ष गेल्यानंतरही जिल्हा शासकीय रुग्णालयात सामान्यांच्या ‘हातात’ रक्ताचा एक थेंबही पडत नसल्याची विदारक स्थिती आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात तर रक्ताचा अक्षरश: थेंबही नसल्यामुळे रुग्णांना खासगी रक्तपेढ्यांकडे मिनतवारी करावी लागली. सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोफत रक्त देण्याचा नियम असल्यामुळे जिवावर आलेल्या काही पेढ्यांनी तर अडवणूक केल्याचा प्रकारही समोर आला आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनी झालेल्या शिबिरांमुळे रक्तपेढीला थोडीफार तरतरी आली असली तरी ती कधी मान टाकेल, याविषयी येथील कर्मचारीच साशंक आहेत.

सामान्यांना सहज व मोफत रक्त मिळण्यासाठी शासकीय रुग्णालयात रक्तपेढी सुरू केली आहे. या रक्तपेढीला आधुनिक यंत्रसामग्रीचा साजही चढवण्याची तयारी सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र, येथील रक्तपेढीत कर्मचार्‍यांना सध्या कामच उरलेले नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, रक्त येण्याचे मार्गच खुंटत चालले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात एकही रक्त संकलनाचे शिबिर झालेले नाही. येथील कर्मचार्‍यांनी अनेक समाजसेवा संस्था व सरकारी कार्यालयांकडे मिनतवार्‍या केल्या; मात्र काही सरकारी कार्यालयांनी खासगी रक्तपेढ्यांना हात देण्यातच धन्यता मानली. परिणामी, रक्तपेढीत रक्ताचा दुष्काळ पडला. त्यात रक्त नसल्यामुळे अनेकांना खासगी पेढ्यांची वाट धरावी लागली. 15 ऑगस्टला पुन्हा एकदा रक्त संकलन झाले.

दिवसाला साधारण 40 रक्तपिशव्यांसाठी मागणी येते. आठवडाभरात 250 पिशव्यांची गरज असून, संकलित होणारे रक्त जास्तीत जास्त चार ते पाच दिवसच उपलब्ध असल्यामुळे पुन्हा रुग्णांना खासगी रक्तपेढ्यांकडे पैसे मोजून रक्त घेण्यासाठी फिरावे लागणार आहे.
एकीकडे मुख्यमंत्री, तर दुसरीकडे रुग्ण
15 ऑगस्टपूर्वी रक्तपेढीत अशी एक वेळ आली की, मुख्यमंत्र्यांसाठी लागणार्‍या रक्तगटाची जेमतेम एकच रक्तपिशवी शिल्लक होती. राजशिष्टाचाराप्रमाणे संबंधित रक्त राखून ठेवावे लागते. नेमके याचवेळी ग्रामीण भागातून आलेल्या एका वृद्धेला नातवासाठी या रक्तगटाची गरज होती; परंतु एकीकडे प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्र्यांसाठी रक्त राखून ठेवावे लागते. शेवटी रक्तपेढीतील कर्मचार्‍यांनी धावपळ करून संबंधित वृद्धेला खासगी रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून दिले.
सिकलसेल, थॅलेसेमिया रुग्णांची अडवणूक जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या थॅलेसेमियासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या आजारात रक्तनिर्मितीच थांबते. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर रक्त बदलावे लागते. त्यासाठी खर्च मोठा असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात मोफत रक्त दिले जाते. त्यासाठी येणार्‍या रुग्णांना सरकारी रक्तपेढीत रक्त नसल्यामुळे खासगी पेढ्यांची वाट धरावी लागत आहे. शासन नियमाप्रमाणे खासगी रक्तपेढ्यांना थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोफत रक्त द्यावे लागते. मात्र, त्यासाठी रुग्णांना शासकीय ओळखपत्र बाळगावे लागते. अनेक रुग्णांचे ओळखपत्र मुंबईला नोंदणीसाठी पाठवले गेले. प्रत्यक्षात सरकारी कामकाजात ते अडकून पडल्यामुळे रुग्णांना खासगी रक्तपेढ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. थॅलेसेमिया कक्षातून पर्यायी म्हणून अर्ज दिला जात असला तरी त्यावरही रक्त मिळवणे अवघड असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
शिबिरे वाढवण्याचा प्रयत्न
रक्ताची मागणी व तुलनेत संकलनाचे प्रमाण कमी आहे. मिनतवार्‍या करूनही सरकारी रक्तपेढीला शिबिरे देण्यासाठी नकार दिला जात आहे. मागील वर्षी साधारण 2500 रक्तपिशव्यांचे संकलन झाले. या वेळी स्वखर्चाने अनेक संस्थांकडे जाऊन समुपदेशन केल्यामुळे ऑगस्टपर्यंत 330 रक्त पिशव्या संकलित झाल्या. मात्र, हे प्रमाणही कमी असून, किमान वर्षभरात पाच हजार रक्तपिशव्या तयार होणे गरजेचे आहे.
- गौरव शितोळे, जनसंपर्क अधिकारी, रक्तपेढी, सिव्हिल
दोन वेळा फेर्‍या मारल्यावर रक्त
माझ्या नातवाला थॅलेसेमियामुळे वारंवार रक्त बदलावे लागते. त्याचा आजार अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे आम्ही त्याची काळजी घेतो. नेहमी जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्त बदलण्यासाठी येतो; मात्र यावेळी तेथे रक्तच नसल्यामुळे खासगी रक्तपेढीकडे जावे लागले. तेथेही दोन चकरा मारल्यावर कोठे रक्त मिळाले. सरकारी रक्तपेढीत जादा रक्त संकलित झाले तर ग्रामीण भागातून येणार्‍या आमच्यासारख्या गरीब रुग्णांची कुतरओढ होणार नाही. सरकारी यंत्रणेने वेळीच दखल घ्यावी.
- बालरुग्णाची आजी