आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था : अपघातातील जखमी तासभर उपचारांविना ; जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांची हेडसांड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गरवारे पॉइंट येथे बुधवारी (दि. 2) दुपारी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले वडील आणि मुलगी चारचाकीतून जाणा-या युवकांना दिसतात... जखमींंच्या मदतीसाठी ते युवक धावतात, त्यातील एक युवक दुभाजकावर पडून जखमी होतो... त्याच अवस्थेत ते युवक जखमी वडील व मुलीला आपल्या गाडीतून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेतात... मात्र, तेथे डॉक्टरांचे उपोषण सुरू आहे, काही डॉक्टर रजेवर आहेत, अशी उत्तरे मिळतात. तेथे आलेल्या परिचारिकांकडूनही उपचारांऐवजी तुम्ही आधी केस पेपर काढा, पोलिसांना बोलवा, असे
सांगण्यात येते... या सर्व औपचारिकतेत तब्बल एक तास जखमी वडील व मुलगी तसेच बाहेर विनाउपचार पडलेले असतात... या सुन्न करणा-या घटनेचा हा ‘लाइव्ह रिपोर्ट...’

गरवारे पॉइंट येथे दुपारी 3.30च्या सुमारास रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या राजू पठाण (वय 35) आणि यांची मुलगी आफरिन पठाण (वय 4) यांना काही युवकांनी उपचारांसाठी स्वत:च्या वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्यामुळे या जखमींना कुठे घेऊन जायचे, असा प्रश्न त्या युवकांना पडला. त्यानंतर एका परिचारिकेकडे विचारणा केली असता, आधी केस पेपर काढण्याचा सल्ला त्यांनी दिला. केस पेपर काढल्यानंतर पोलिस ठाण्यात याची माहिती द्या तेव्हाच उपचार सुरू करण्यात येतील, असे सांगण्यात आले.

दरम्यान, काही डॉक्टरांना उपचारांसाठी या युवकांनी सांगितले असता, रजेवर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. संतप्त युवकांनी थेट उपोषणास बसलेल्या डॉक्टरांकडे जाऊन उपचारांसाठी काही मदत करा, असे सांगितले. मात्र, तेथेही तुम्ही पालकमंत्र्यांकडे जा, असे सांगण्यात आले. डॉक्टरांनी रुग्णांच्या सेवेला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे मानले जाते. मात्र, बुधवारी या रुग्णालयात एकही डॉक्टर स्वत:हून उपचारांसाठी समोर आला नाही. तब्बल एक तासापासून रुग्णालयात आणलेल्या व उपचारांची प्रतीक्षा करणा-या या जखमींवर त्यानंतर केवळ जुजबी स्वरूपाचे उपचार करण्यात आले.

...हा तर उच्च न्यायालयाचाच अवमान
कोणत्याही रुग्णालयात उपचारांसाठी येणा-या अपघातग्रस्तांवर प्रथम कोणताही केस पेपर वा पोलिस कारवाईची विचारणा न करता तातडीने उपचार करणे बंधनकारक असल्याचे आदेश उच्च् न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आहेत. कोणत्याही रुग्णांना डॉक्टर अडवत असतील, तर हा उच्च् न्यायालयाचाच अवमान असल्याचे वरिष्ठ वकील अ‍ॅड. एम.टी.क्यू. सय्यद यांनी सांगितले.
उपचार होणे गरजेचे
- गरवारे पॉइंट येथून जाताना रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या वडील व मुलीला उपचारांसाठी आम्ही जिल्हा रुग्णालयात आणले. परंतु, आधी केस पेपर काढा, नंतरच उपचार होतील, असे सांगण्यात आले. वास्तविक तातडीने उपचार होणे गरजेचे होते. तुकाराम मोजाड, युवक

प्रशासनाने लक्ष द्यावे
उपोषण वा आंदोलनांदरम्यान ब-याचदा डॉक्टरांकडून रुग्णांकडे दुर्लक्ष होताना दिसते. मात्र, तरीही त्यांच्याकडून ज्यासाठी आंदोलन केले जाते त्या विविध मागण्यांना मंजुरी मिळते. त्यामुळे अशा घटनांवर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. विनोद संथ, युवक
दुस-या दिवशीही रुग्णसेवा ठप्प

विविध मागण्यांसाठी शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांच्या मॅग्मो संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे बुधवारी (दि. 2) दुस-या दिवशीही आरोग्यसेवा ठप्प होती. त्यामुळे जिल्हाभरातील रुग्णांची आंदोलनकर्त्या डॉक्टरांसमोरच गैरसोय होत असल्याचे दिसले. नियोजित शस्त्रक्रिया, तपासण्या रद्द झाल्या. दरम्यान, आंदोलन काळात नियुक्त राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांर्तगत 150 डॉक्टरांनीही बुधवारी कामास नकार देत आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा मॅग्मो संघटनेने केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून राज्यभरातील आरोग्याधिकारी संपावर गेले आहेत. त्यात सिव्हिल व आरोग्य विभागांतर्गत येणारी 10 उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये अशा जवळपास 125 आरोग्य केंद्रांवर रुग्णसेवा ठप्प झाली. या आंदोलनामुळे तपासणीसाठी येणा-या शेकडो रुग्णांना तासन् तास ताटकळावे लागले. काही प्रशिक्षणार्थी डॉक्टर, परिचारिकांच्या माध्यमातून तपासणी झाली. मात्र, त्यातही गोंधळ उडाला. डॉक्टरांसोबतच औषधनिर्मातेही संपावर असल्याने औषधांसाठीही रुग्णांना वणवण फिरावे लागते आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व निवासी वैद्यकीय अधिका-यांसह वर्ग एकच्या अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त 30 वैद्यकीय अधिका-यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, तरीही आरोग्य सेवेचा बोजवाराच उडाल्याचे दिसून आले.

कंत्राटी डॉक्टरही संपात
आरोग्य विभागाने रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी स्वतंत्रपणे 150 तात्पुरते डॉक्टर नियुक्त करण्यात आले होते. त्यांनीही मॅग्मोला पाठिंबा दर्शविल्याने पूर्णपणे यंत्रणा ठप्प झाल्याचा दावा डॉ. प्रदीप जायभावे यांनी केले. दरम्यान, गुरुवारी (दि.3) गंभीर जखमी वा अत्यावश्यक रुग्ण आल्यास त्यांची प्रवेशद्वारावरच तपासणी केली करण्याचा निर्णय घेतल्याचे नाशिक शाखेचे डॉ. जायभावे, डॉ. मोहन बच्छाव, संजय पवार, डॉ. अरविंद माहुलकर, डॉ. युवराज देवरे यांनी सांगितले.