आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नांचा चुराडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शासकीय-निमशासकीय नोकरीसाठी रस्त्यावर विकले जाणारे अर्ज संबंधित आस्थापनांकडे न पोहोचवता अक्षरश: फाडून रद्दीसारखे वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयासमोरील विक्रेत्याकडून होणार्‍या या विश्वासघातकी प्रकारामुळे अर्ज भरून देणार्‍या युवकांच्या स्वप्नांवर अक्षरश: पाणी फिरवण्याचे काम दिवसाढवळ्या केले जात आहे. ‘दिव्य मराठी’च्या हाती त्याचे पुरावेच लागले आहेत.

शासकीय नोकर्‍यांच्या जागा भरणे आहे, असे फलक लावून जिल्हा कोर्टालगत व होमगार्ड कार्यालयानजीक (गुरुकृपा) अशा नावांसह अर्जविक्री केली जाते. प्रत्येक अर्जासाठी 20 व ते भरून आस्थापनेकडे पाठविण्यासाठी 30 रुपये असे एकूण 50 रुपयांचे शुल्क आकारले जाते. अर्ज पोस्टाने पाठविण्याच्या आश्वासनानंतरही अनेक अर्ज रद्दी म्हणून काही विक्रेत्यांकडे दिले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

अर्ज भरतोय, अद्याप एकही कॉल नाही
मी दर शनिवारी ‘गुरुकृपा’ या विक्रेत्याकडून अर्ज घेतो आणि भरून त्याच्याकडेच देतो. मात्र, वर्षभरापासून कॉल न आल्याने नशिबाला दोष देत होतो.मात्र आता वस्तूस्थिती समजली.-राजेश कांबळे, विल्होळी

असे झाले उघड
जिल्हा न्यायालय परिसरातील एका दुकानात ‘जबाबदार नागरिक’ गेला असता, तिथे अर्ज ‘रेल्वे’कडे न पाठवता रद्दी म्हणून फाडून आणून दिल्याचे संबंधित दुकानदाराने या नागरिकाला सांगितले. या नागरिकामुळेच हा गैरप्रकार उघडकीस आला.

ही काळजी घ्या
अर्ज भरण्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता उमेदवार ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणेच परिपूर्ण भरलेला अर्ज संबंधित आस्थापनेपर्यंत पोहोचावा या साठी पाकिटात भरुन सविस्तर पत्ता टाकून आणि पोस्टाच्या मुख्य कार्यालयात जाऊन तो पत्रपेटीत टाकावा.

तुम्हाला काय छापायचे ते छापा
आठवड्यात 12 ते 15 नोकर्‍यांच्या जाहीराती येतात. त्यासाठी रोज अर्ज माझ्याकडे येतात, मुदत संपल्यानंतर उरलेले अर्ज रद्दीत देतो, एखादा अर्ज रद्दीत गेला म्हणून सांगतो ना? तुम्हाला काय छापायचे ते छापा. राजा दळवी, अर्ज विक्रेता, जिल्हा कोर्टासमोर

हजारो युवकांच्या स्वप्नांचा चुराडा
रेल्वेच्या ट्रॅकमन पदासाठी माझ्या हस्ताक्षरातील हा फाडलेला अर्ज बघून त्या विक्रेत्याकडे येणार्‍या हजारो अर्जांचे तो काय करत असेल त्याची जाणीव होते आहे. -गणपत त्र्यंबक गवारी , इगतपुरी